

Mamata Banerjee setback : पश्चिम बंगालमध्ये पुन्हा सत्ता काबीज करून इतिहास घडविण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सज्ज झाला आहे. काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनेही जय्यत तयारी केली आहे. एकही आमदार नसलेल्या काँग्रेसकडूनही चाचपणी सुरू करण्यात आली आहे. या धामधुमीतच ममतादीदींना मोठा धक्का बसला आहे.
तृणमूल काँग्रेस पक्षाच्या राज्यसभा खासदार मौसम नूर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्षासाठी हा मोठा झटका मानला जात आहे. राज्यात तृणमूलला पराभूत करण्यासाठी भाजपनेही कंबर कसली आहे. त्यामुळे तृणमूलच्या नेत्यांना खेचण्यासाठी भाजपही प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. मात्र, नूर यांनी भाजप नव्हे तर काँग्रेसला पसंती दिली आहे. त्यांनी शनिवारी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
नूर या राज्यसभेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहे. सोमवारी राज्यसभा सभापतींकडे त्या आपल्या सदस्यत्वाचा राजीनाना सोपवतील. त्यांच्या सदस्यत्वाची मुदत याचवर्षी संपणार आहे. दरम्यान, नूर यांनी काँग्रेसचे महासचिव जयराम रमेश, बंगाल काँग्रेसचे प्रभावी गुलाम अहमद मीर आणि प्रदेशाध्यक्ष शुभंकर सरकार यांच्या उपस्थितीत दिल्लील पक्षप्रवेश केला.
नूर या २००९ आणि २०१४ मध्ये मालदा उत्तर मतदारसंघाच्या काँग्रेसच्या खासदार होत्या. २०१० च्या निवडणुकीआधी त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश करत निवडणूक लढविली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ममतादीदींनी २०२० मध्ये नूर यांना राज्यसभेवर पाठविले. एप्रिल महिन्यातच त्यांचा कार्यकाळ संपणार आहे.
मौसम नूर या एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते बरकत गनी खान यांच्या भाची आहेत. घरवापसी झाल्यानंतर मीडियाशी बोलताना नूर म्हणाल्या, वातावरण बदलले आहे. कोणत्याही त्रासामुळे नव्हे तर गनी खान चौधरी कुटुंब आणि काँगेसची एकजुटता लक्षात घेऊन टीएमसीतून बाहेर पडत घरवापसी केली आहे. आता पक्ष जी जबाबदारी सोपवेल, ती पार पाडीन.
नूर यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे पक्षाची मुस्लिम बहुल मालदा भागात ताकद वाढली आहे. मालदा दक्षिण लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे ईशा खान चौधरी खासदार आहे. ते गनी खान चौधरी यांचे भाचे आहेत. ईशा यांची पत्नी मौसम नूर यांची बहीण आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मौसम आणि ईशा हे दोघे एकमेकांविरोधात उभे ठाकले होते. त्याचा फायदा भाजपला झाला होता. २०२४ मध्ये मौसम यांनी निवडणूक लढविली नाही. त्यानंतरही भाजपच्या उमेदवाराला निसटता विजय मिळाला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.