

BJP party suffers major setback : मणिपूरच्या राजकीय वर्तुळातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) आमदार सपम कुंजकेश्वर सिंह यांचे निधन झाले आहे. वयाच्या 67 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शुक्रवारी पहाटे नवी दिल्लीतील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्या निधनामुळे भाजपसह संपूर्ण मणिपूरच्या राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
सपम कुंजकेश्वर सिंह हे मणिपूरमधील पाटसोई विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात 2007 मध्ये झाली. त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक लढवली आणि विजय मिळवला. त्यानंतर 2022 मध्ये भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत त्यांनी पुन्हा आमदारकी मिळवली. त्यामुळे पाटसोई मतदारसंघात त्यांचा राजकीय प्रभाव होता. त्यांच्या पश्चात पत्नी आणि चार मुले असा परिवार आहे.
त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी शोक व्यक्त केला. मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंह, उपमुख्यमंत्री लोसीई दिको आणि काँग्रेस नेते कीशम मेघचंद्र सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
दरम्यान, दिवंगत आमदार सपम कुंजकेश्वर सिंह यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मणिपूर सरकारने संपूर्ण राज्यात अर्ध्या दिवसाची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यांच्या निधनाने भाजपने एक अनुभवी लोकप्रतिनिधी गमावला असून, मणिपूरच्या राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे.