

Rocket attack India news : काही दिवसांपूर्वीच भाजपने पुन्हा सत्ता स्थापन केलेल्या मणिपूरमधील हिंसाचाराने डोके वर काढले आहे. विष्णूपूर जिल्ह्यात कुकी उग्रवाद्यांनी मंगळवारी रॉकेट हल्ला केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला असून त्यांची आई गंभीर जखमी आहे. त्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी तणावाची स्थिती आहे.
कथित रॉकेट हल्ल्यानंतर मणिपूर सरकारने विष्णूपूर जिल्ह्यात कर्फ्यू लावला असून इंफाळ पूर्व, इंफाळ पश्चिम, काकचिंग आणि विष्णूपर या पाच जिल्हयांमधील इंटरनेट सेवा तीन दिवसांपासून तातडीने बंद केली आहे. चुकीची माहिती व अफवा पसरू नये, तसेच कायदा-सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
विष्णूपूरमध्ये मंगळवारी पहाटे रॉकेट हल्ला झाल्याचे सांगितले जात आहे. जिल्ह्यातील एका गावामध्ये नागरी वस्तीवर हा हल्ला करण्यात आला. घरामध्ये झोपेत असलेला पाच वर्षांचा एक मुलगा व सहा महिन्यांच्या मुलीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचार भडकल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे.
उग्रवाद्यांच्या हल्ल्यानंतर स्थानिकांमध्ये संताप निर्माण झाला. त्यांनी जवळच्या एका पेट्रोल पंपावरील तेलाचे दोन टॅंकर पेटवून दिले. तसेच पोलीस ठाण्यासमोर टायर जाळून निदर्शने करण्यात आली. एका पोलीस चौकीचेही मोठे नुकसान झाले आहे. स्थितीवर नियंत्रण मिळविण्यात आले असून सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.
मुख्यमंत्री वाय. खेमचंद यांनी सांगितले की, हा हल्ला निंदनीय कृत्य आहे. हा थेट मानवतेवर हल्ला असून मणिपूरमध्ये खूप परिश्रमातून निर्माण झालेली शांतता बिघविण्याचा हा प्रयत्न आहे. या घटनेला जबाबदार लोकांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. अशा दहशतवादी कृत्यांना कोणत्याही स्थितीत स्वीकारले जाणार नाही. लोकांनी एकजुटीने अशा लोकांविरोधात उभे राहावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान, मणिपूरमध्ये २०२३ नंतर सातत्याने हिसांचाराच्या घटना घडत आहेत. त्यानंतर भाजपच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला होता. राज्यात अनेक महिने राष्ट्रपती राजवट होती. काही दिवसांपूर्वीच राष्ट्रपती राजवट हटविण्यात आल्यानंतर पुन्हा भाजपने सत्ता मिळविली आहे. त्यानंतर ही पहिलीच मोठी घटना ठरली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.