
Manmohan Singh News: भारताचे माजी पंतप्रधान व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (ता.26) निधन झालं आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात सिंग यांना दाखल करण्यात आलं होतं. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांच्यावर उपचार सुरु होते.
उपचारादरम्यान, 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. भारताच्या उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळासह सर्वच स्तरांतून शोक व्यक्त केला जात आहे.
अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांनी त्यांच्या कार्यकाळात देशाच्या अर्थव्यवस्थेचे उदात्तीकरण करण्यात आलं. भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली. 1996 साली ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली यूपीएची सत्ता आल्यानंतर सिंग यांनी भारताचे 13 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2004 ते 2014 या यूपीए सरकारच्या काळात त्यांनी दोनवेळा पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळली. एप्रिल 2024 साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्ती घेतली होती.
मनमोहन सिंग यांनी नम्र,अभ्यासू, स्वभावानं राजकारणात स्वपक्षीयांसह विरोधी पक्षांच्या नेत्यांच्याही मनात आदर निर्माण केलं. त्यांना राजकारणात अजातशत्रू म्हटलं आहे.याचमुळे त्यांच्या निधनांनंतर काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही श्रध्दांजली वाहिली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (Narendra Modi) अनेक नेत्यांचा समावेश आहे.
भारताने आपले सर्वात प्रतिष्ठित नेते डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. नम्र उत्पत्तीतून उठून, तो एक सन्माननीय अर्थशास्त्रज्ञ बनला. त्यांनी विविध सरकारी पदांवर तसेच अर्थमंत्री म्हणून काम केले आणि गेल्या काही वर्षांत आमच्या आर्थिक धोरणावर मजबूत ठसा उमटवला. संसदेतील त्यांचा हस्तक्षेपही अभ्यासपूर्ण होता. आपले पंतप्रधान या नात्याने त्यांनी लोकांचे जीवन सुधारण्यासाठी व्यापक प्रयत्न केले.
सोनिया गांधी यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर ट्विट करत आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.त्या म्हणतात, अतिशय दुःखद. काँग्रेस परिवाराचे मोठे नुकसान झाले आहे. कुटुंब, मित्र आणि हितचिंतकांच्या मनःपूर्वक संवेदना असल्याचे पोस्टमध्ये लिहिलं आहे.
केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनीही मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर भावना व्यक्त केल्या आहेत. ते पोस्टमध्ये म्हणतात,देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अत्यंत दु:ख झाले. देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचे काम केले.
उच्चशिक्षित असण्याबरोबरच त्यांचे व्यक्तिमत्व नम्र, सभ्य, संवेदनशील आणि देशाप्रती समर्पित होते. भाजप अध्यक्ष म्हणून मला त्यांच्याशी अनेकदा बोलण्याची संधी मिळाली. देशाला पुढे नेण्याचा विचार त्यांच्या मनात नेहमीच होता. हा देश डॉ. मनमोहन सिंग यांना कधीही विसरू शकत नाही. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबाला शक्ती देवो असंही त्यांनी म्हटलं आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही ट्विट करत मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहिली आहे. मनमोहन सिंग यांनी अफाट हुशारी आणि सचोटीने भारताचे नेतृत्व केले. त्यांची नम्रता आणि अर्थशास्त्राची सखोल जाण यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली. श्रीमती कौर आणि कुटुंबियांना माझ्या मनःपूर्वक संवेदना. मी एक मार्गदर्शक गमावला आहे. आपल्यापैकी लाखो ज्यांनी त्याचे कौतुक केले ते त्याला अत्यंत अभिमानाने आठवतील.
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनीही सोशल मीडियावरील X माध्यमांवर पोस्ट करत आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत.ते पोस्टमध्ये म्हणतात,भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही देशाची कधीही भरून न येणारी हानी आहे. त्यांच्या विद्वत्ता आणि साधेपणाचे गुण शब्दात मांडणे अशक्य आहे. त्या पुण्यवान आत्म्यास ईश्वर चरणी स्थान देवो. त्यांच्या कुटुंबीयांना आणि हितचिंतकांना माझ्या संवेदना.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही ट्विटद्वारे मनमोहन सिंग यांच्या निधनावर आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.त्या पोस्टमध्ये लिहितात, आपले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आकस्मिक निधनाने अत्यंत स्तब्ध आणि दु:ख झाले आहे. मी त्यांच्यासोबत काम केले होते आणि त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात अगदी जवळून पाहिले होते. त्यांचे पांडित्य आणि शहाणपण निर्विवाद होते आणि त्यांनी देशात केलेल्या आर्थिक सुधारणांची सखोलता सर्वत्र मान्य केली जाते.देश त्यांच्या कारभारीपणाला मुकेल आणि मला त्यांच्या प्रेमाची उणीव भासेल, अशी खंतही मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या संवेदना व्यक्त करतानाच माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद असल्याचं म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपासून ते देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी देशाच्या कारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. या दु:खाच्या प्रसंगी मी त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि समर्थकांप्रती संवेदना व्यक्त करतो. वाहेगुरुजी त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो असंही शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही ट्विट करत मनमोहन सिंग यांच्या निधनावर दु:खं व्यक्त केलं आहे.ते पोस्टमध्ये म्हणतात, भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतीव दु:ख झाले. आपल्या देशाने एक महान अर्थतज्ज्ञ, द्रष्टा सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावला आहे.
त्यांच्या रूपाने एक ईश्वरीय आत्मा स्वर्गाच्या प्रवासाला निघून गेला ही अतिशय वेदनादायक बातमी आहे. डॅा. मनमोहन सिंह विनयशीलता, सहनशीलता, सहिष्णुता आणि करुणेचे प्रतीक होते . भारताची आर्थिक सुधारणा घडवून आणणारे हे महान व्यक्तिमत्त्व येणाऱ्या पिढ्यांसाठी अक्षय्य प्रेरणास्त्रोत राहिल,असा विश्वासही पवार यांनी यावेळी बोलून दाखवला आहे.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनीही माजी पंतप्रधान आणि प्रसिद्ध अर्थतज्ञ श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाने खूप दुःख झाल्याचंही म्हटलं आहे. त्यांनी एक बौद्धिक राजकारणी, डॉ सिंग यांनी नम्रता, शहाणपण आणि सचोटीला मूर्त रूप दिले. 1991 मध्ये अर्थमंत्री म्हणून त्यांच्या आर्थिक सुधारणांपासून ते पंतप्रधान म्हणून त्यांच्या नेतृत्वापर्यंत त्यांनी अथकपणे देशाची सेवा केली आणि लाखो लोकांची उन्नती केली. त्यांचे जाणे देशाचे मोठे नुकसान असल्याचंही नायडू यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणतात, आपले माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाने आपण एक महान अभ्यासक, अर्थतज्ज्ञ आणि राजकारणी गमावला आहे.10 वर्षे पंतप्रधान म्हणून देशाची सेवा करत भारतीय आर्थिक सुधारणांमध्ये त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील असंही फडणवीसही म्हणाले आहेत.
याचवेळी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही मनमोहन सिंग यांना श्रध्दांजली वाहिली आहे. ते म्हणतात, थोर अर्थतज्ञ आणि नम्र आणि सौम्य व्यक्तिमत्व असलेले देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु:खद आहे. देशभरातील लाखो आरपीआय कार्यकर्त्यांच्या वतीने मी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.