
Devendra Fadnavis: मराठीच्या मुद्द्यावरुन राज्यात सध्या संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली असताना दिल्लीत नुकत्याच दोन महत्वाच्या घडामोडी घडल्या. मराठी लोकांना 'पटक पटक कर मारेंगे' असं म्हणणारे भाजपचे खासदार शशिकांत दुबे यांना महाराष्ट्रातील काँग्रेसच्या महिला खासदारांनी घेरलं आ्णि त्यांच्या विधानाबद्दल जाब विचारत जय महाराष्ट्र म्हणायला भाग पाडलं. तर दुसरीकडं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधुंनाच डिवचवलं. दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलताना फडणवीसांनी हे भाष्य केलं आहे.
फडणवीस म्हणाले, शेवटी भाषा हे संवादाचं माध्यम आहे. भाषा विवादाचं माध्यम होऊच शकत नाही. भाषेच्या माध्यमातून ज्ञानाचा खजिना आपल्यापर्यंत पोहोचतो. आपला वाद हा मराठी की हिंदी? असा नाहीए. मराठी ही आहेच, मराठीशिवाय पर्यायच नाहीए. मराठी आपण स्विकारलीच पाहिजे. पण मराठीसोबत भारतीय भाषा अशा प्रकारची आपली भूमिका आहे. कुठल्याही भारतीय भाषेचा अभिमान वाटला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषेचा आग्रह होणं हे स्वाभाविक आहे, हे चुकीचं नाही. पण भाषेवरुन वाद होणं. भाषेवरुन कोणाला मारहाण होणं हे सहन केलं जाणार नाही. अशा घटनांवर आम्ही कठोर कारवाई केली आहे. यापुढेही अशा घटना घडल्या तर आम्ही त्यावर कारवाई करणार असंही फडणवीसांनी म्हटलं.
मराठी माणूस संकुचित विचार करु शकत नाही, याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्याला संकुचित विचार करायला शिकवलंच नाही. ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलं ते संपूर्ण विश्वासाठी मागितलं. तसंच छत्रपतींच्या विचारानं प्रेरित होऊन मराठ्यांनी कधी स्वतःचा विचार केला नाही. संपूर्ण भारतभर आपल्या संस्कृतीचा झेंडा लागला पाहिजे आणि संपूर्ण भारत हा परकीय आक्रमांकडून मोकळा झाला पाहिजे यासाठी मराठे लढले.
पानीपतची लढाई ही मराठ्यांची लढाई नव्हती. मराठ्यांनी त्यातून अंग काढलं असतं तरी कोणी काही म्हटलं नसतं. पानीपतच्या लढाईसाठी या ठिकणच्या बादशानं सांगितलं की अहमदशाह अब्दाली आला त्याला आम्ही थांबवू शकत नाही. तुम्ही याला थांबवण्याचा प्रयत्न करा आणि मराठ्यांनी हे शिवधनुष्य पेलायचं ठरवलं. त्याला यमुनेपार नेलं त्यानंतर अहमदशहा अब्दालीनं मराठ्यांना पत्र लिहीलं की मला तुमच्याशी तह करायचा आहे. त्यानुसार त्यानं म्हटलं की, पाकिस्तानासह भारतातला पंजाब, सिंध आणि बलुचिस्तान हे तीन प्रांत हे माझे आहेत हे तुम्ही मान्य करा. नंतर उरलेला भारत हा मराठ्यांचा आहे हे मी मान्य करतो.
पण मराठ्यांनी हे झुगारलं आणि एक इंच देखील जमीन तुम्हाला देणार नाही, असं ठामपणे सांगितलं. पण त्या लढाईत मराठ्यांचं आतोनात नुकसान झालं. पण दहाच वर्षात शिंदेंनी पुन्हा एकदा दिल्लीवर मराठ्यांचा झेंडा लावला आणि दिल्ली जिंकून दाखवली. हा खऱ्या अर्थानं आपला इतिहास आहे. त्यामुळं देशासाठी लढणारा मराठी माणूस हा संकुचित विचार करु शकत नाही, हा इतिहासाचा दाखला देत महाराष्ट्रात हिंदीच्या सक्तीला विरोध करणाऱ्या ठाकरे बंधुंना मुख्यमंत्र्यांनी डिवचलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.