Chandigarh : हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करत भाजपने इतिहास घडवला. स्वबळावर सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याबाबत उत्सुकता वाढली होती. त्यातच केंद्रीय नेत्वृत्वाने निरीक्षक म्हणून गृहमंत्री अमित शाह यांची नियुक्ती केल्याने भाजप हरियाणात धक्का देणार, अशी चर्चा होती.
अमित शाह यांनी बुधवारी नवनियुक्त आमदारांच्या बैठकीत हजेरी लावली. त्यानंतर पक्षाचे नेते व आमदार अनिल विज यांनी भाजप विधिमंडळ नेतेपदासाठी नायब सिंह सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. त्याला सर्व आमदारांची संमती मिळाल्यानंतर सैनी हेच पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतील, हे निश्चित झाले.
अनिल विज यांच्यास राव इंद्रजीत सिंह हेही मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असल्याचे मानले जात होते. दोघांनीही यापूर्वी उघडपणे याबाबत भाष्य केले होते. त्यामुळे पक्षांतर्गत नाराजी दूर करण्यासाठी खुद्द शहांनी सगळी सुत्र हाती घेत पुन्हा सैनी यांच्यावर जबाबदारी टाकली आणि हरियाणा भाजपमध्ये एकजुटीचा संदेश दिला.
नायब सिंह सैनी यांच्या सरकारचा शपथविधी गुरूवारी होणार आहे. त्याआधी आज सैनी हे राज्यपालांकडे जाऊन सरकार स्थापनेचा दाव करतील. त्यानंतर शपथविधीही प्रक्रिया सुरू होईल. दरम्यान, विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्यानंतर बोलताना सैनी यांनी हरियाणातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले. तेच आपण आजच सरकार स्थापनेचा दावा करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हरियाणामध्ये भाजपला 90 पैकी 48 जागांवर विजय मिळाला आहे. तर काँग्रेसचा आकडा 37 पर्यंतच थांबला. तीन अपक्ष आमदारांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारकडील आमदारांची संख्या 51 वर पोहचली आहे. राज्यात बहुमतासाठी 46 हा जादुई आकडा आहे.
नायब सिंह सैनी यांनी काही महिन्यांपुर्वीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यांच्याआधी मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री होते. खट्टर हे आता केंद्रीय मंत्री आहेत. हरियाणामध्येही उत्तराखंड पॅटर्न राबवण्यात आला आहे. निवडणुकीला काही महिने बाकी असतानाच 2021 मध्ये पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते. निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनाच मुख्यमंत्री करण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.