पुणे : राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) पुण्यातील कोंढवा भागात छापे टाकून दहशतवादाशी संबंधित साहित्य जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. तल्हा खान (३८ वर्ष) या व्यक्तीच्या घरावर छापा टाकून एनआयएने इस्लामिक स्टेटशी संबंधित काही कागदपत्रे आणि डिजिटल साहित्य जप्त केले आहे. तल्हा खान हा इस्लामिक स्टेट खुरासान प्रांत या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात होता आणि या संघटनेची विचारधारा पसरवण्याचे काम करत होता असा ठपका एनआयएने ठेवला आहे. (Pune Latest News Updates)
याबाबत अधिक माहिती अशी की, एनआयएने सुरुवातीला जहानझीब वानी आणि हिना बशीर बेग या काश्मिरी दाम्पत्याला मार्च २०२० मध्ये अटक केली होती. ८ मार्च २०२० रोजी दिल्लीतील लोधी कॉलनी पोलीस स्थानकामध्ये या गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर एनआयएने देखील २० मार्च २०२० रोजी या प्रकरणाची पुन्हा नोंद केली. याच प्रकरणाच्या तपासादरम्यान एनआयएने अब्दुल्ला बसीत, सादिया अन्वर शेख, नबील सिद्दीकी खत्री आणि अब्दुल रहमान या चौघांना अटक केली होती.
जहानझीब वानी आणि हिना बेग हे कश्मिरी दाम्पत्य पुण्यात व्यायामशाळा चालवणाऱ्या नबील सिद्दीकी खत्री आणि सादिया अन्वर शेख यांच्या संपर्कात होते. एनआयएने खत्रीवर भारतात हिंसक दहशतवादी हल्ले घडवण्यास मदत केल्याचा आरोप केला होता, तर सादियावर भारतात IS चे कॅडर तयार करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होता. सादिया आणि खत्री यांना जुलै २०२० मध्ये एनआयएने अटक केली होती. याशिवाय हे कश्मिरी दाम्पत्य हैदराबादच्या अब्दुल्ला बासितच्याही संपर्कात होते, ज्याला ISIS च्या अबूधाबी मॉड्यूलशी संबंधित प्रकरणात अटक करण्यात आली होती.
पुण्यातील तल्हा खान हा व्यायामशाळा चालक नबील सिद्दीकी खत्रीच्या संपर्कात असल्याचे एनआयएला तपासादरम्यान आढळून आल्यानंतर ही छापेमारी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु आहे. या प्रकरणी एनआयएने आतापर्यंत ६ आरोपींवर आरोपपत्र दाखल केले आहे. त्यांच्यावर भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी समविचारी लोकांचा पाठिंबा मिळवून ISIS ची विचारसरणी पसरवण्याचा कट रचणे, ISIS साठी काम करण्यासाठी सेल स्थापन करणे, निधी उभारणे, शस्त्रे गोळा करणे, आयईडी बनवणे आणि टार्गेट करुन हत्या करणे असे गंभीर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.