
Waqf Bill News : लोकसभेत वक्फ सुधारित विधेयकावर चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने लोकसभा खासदार निलेश लंके यांनी आपले मत मांडले. यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार मांडत केंद्र सरकार कसे त्याविरोधी भूमिका घेत आहे, असे सांगितले. भाषणानंतर शेजारी बसलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांची पाठ थोपटली अन् अध्यक्षांनीही कौतुक केले.
वक्फ विधेयकावर पक्षाची भूमिका मांडण्याची मोठी संधी लंके यांना मिळाली. यावेळी ते म्हणाले, सत्तेत येण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले, पण सत्ता मिळाल्यानंतर त्यांच्या विचारांना सोडून चालला आहात, हे दुर्दैवी आहे. शिवराय हे केवळ तलवार चालवणारे योद्धे नव्हते, तर सर्व धर्मांना समान वागणूक देणारे, लोकशाही मूल्ये जपणारे राजे होते. त्यांनी समाज, धर्म, पंथ, जात, भाषा न पाहता सर्वांना सोबत घेतले. त्यांनी माणूस पाहिला आणि माणुसकीला जागवले, असे लंके म्हणाले.
‘सर्व धर्मांना मान दिला, प्रत्येकाला सन्मान दिला. जातीपातीचा नको भेद, साऱ्यांना दिला एकच वेद. न्याय करूया, धैर्य अपार, असाच होता शिवरायांचा विचार,’ या ओळींतून लंकेंनी शिवाजी महाराजांचे विचार मांडले. त्यानंतर त्यांनी विधेयकातील अनेक त्रुटींवर बोट ठेवले. वक्फ बोर्ड सशक्त करायचा आहे, पण प्रत्यक्षात त्याचे अधिकार सरकारकडे हस्तांतरित होत असल्याचे त्यांनी सांगितले.
देशभरात वक्फ बोर्डाकडे सुमारे 9.4 लाख एकर जमीन आहे, आणि त्याची अंदाजे किंमत 1.2 लाख कोटी रुपये असून सरकारला हे वक्फ बोर्डाचे सशक्तीकरण आहे की त्यावर ताबा मिळवण्याचा आहे? असा प्रश्न उपस्थित केला. हे विधेयक लोकशाही प्रक्रियेला धक्का पोहोचवत आहे. वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांची सरकार थेट नेमणूक करणार आहे, ही बाब संविधानाच्या विरोधात आहे. आधी बोर्ड स्वतः निर्णय घेत असे, आता मात्र तो निर्णय एक सरकारी अधिकारी घेणार आहे. हे सरकारचा हस्तक्षेप वाढल्याचे चिन्ह असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
"स्वतःसाठी नको, सर्वांसाठी लढा, हा विचार आहे शिवरायांचा धडा. घेऊ नको सत्ता फक्त नावाला, सत्ता असावी सेवा जनतेच्या भावाला," या ओळींतून त्यांनी जो समाजाच्या भावना समजून घेत नाही, त्याला इतिहास कधीच माफ करत नाही, असा इशाराही सरकारला दिला. विधेयकावर निर्णय घेताना फक्त कायदे, फायदे किंवा मालमत्ता न पाहता, जनतेच्या भावना, संविधानाचे मूल्य आणि छत्रपती शिवरायांचे सर्वसमावेशक विचार लक्षात घ्यावेत, असे आवाहन करत लंकेंनी भाषण संपवले.
लंकेंनी भाषण संपवताच सुप्रिया सुळे यांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. त्यानंतर तालिका अध्यक्षांनीही त्यांचे कौतुक केले. छत्रपती शिवाजी महाराजांची महती खूप चांगल्याप्रकारे सांगितली. आपल्या सर्वांना हेही माहिती आहे की, छत्रपती शिवाजींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे. सभागृहाच्या माध्यमातून याचीही सर्वांना माहिती व्हायला हवी, असे तालिका अध्यक्ष दिलीप सैकिया म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.