

दहावीत शिकणाऱ्या शौर्य पाटीलच्या मृत्यू प्रकरणात पोलिस कारवाई होत नसल्याने नीलेश लंके यांनी थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली.
लंके यांच्यासोबत भास्कर भगरे गुरुजी आणि राजाभाऊ वाजेदेखील उपस्थित होते.
त्यांनी FIR असूनही कारवाई का होत नाही? असा सवाल उपस्थित करीत दिल्ली सरकारकडे न्यायाची मागणी केली.
News Delhi News : दहावीत शिकणारा शौर्य पाटील याच्या मृत्यूप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार नीलेश लंके यांनी थेट दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून अजून कारवाई का होत नाही, असा सवाल त्यांनी केला. खासदार लंकेंबरोबर खासदार भास्कर भगरे गुरुजी आणि खासदार राजाभाऊ वाजे देखील होते.
दिल्लीतील गोल मार्केट इथं सेंट कोलंबाज स्कूलमध्ये शौर्य प्रदीप पाटील दहावीत शिक्षण घेत होता. तो मूळचा सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वरचा आहे. 18 नोव्हेंबर 2025ला राजेंद्रनगर मेट्रो स्टेशन इथं शौर्य पाटील यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याचा शिक्षकांकडून झालेल्या कथित छळाचा उल्लेख केला आहे.
स्कूलच्या प्राचार्या मिस अपराजिता पाल, कोऑर्डिनेटर मिस मनु कालरा, शिक्षिका मिस युक्ती महाजन आणि मिस जूली वर्गीस यांचा शौर्य पाटील याच्या सुसाईड नोटमध्ये उल्लेख आहे. शौर्य याच्या कुटुंबियांनी पोलिसांत गुन्हा दाखल करूनही अद्याप आरोपींविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली नसल्याकडे खासदार लंके यांनी लक्ष वेधलं. कारवाई न झाल्यामुळे खासगी मिशनरी शाळांच्या प्रभावाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले.
शौर्य पाटील याच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी खासदार नीलेश लंके यांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि दिल्लीचे शिक्षण मंत्री अशोक सूद यांना पत्राद्वारे चौकशी समिती स्थापन करण्याची मागणी केली होती. आजच्या बैठकीतही त्यांनी प्रकरणातील विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून सहा प्रमुख मागण्यांवर लक्ष वेधलं.
खासदार लंकेंनी आरोपी शिक्षकांवर तातडीने कारवाई करणे, शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकांना निलंबित करणे, प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालविणे, दिल्ली सरकारने वरिष्ठ वकील नेमणे, आरोपींवर कठोर कारवाई सुनिश्चित करणे आणि पीडित परिवाराला सुरक्षा पुरविणे यांचा समावेश होता.
लंकेंकडून शौर्यच्या आईच्या वेदनांचा उल्लेख!
शौर्यच्या आईने सहन केलेल्या वेदनेचा उल्लेख खासदार लंकेंनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यासमोर केला. “एका आईच्या नात्याने आपण तातडीने हस्तक्षेप करावा,” अशी विनंती खासदार लंकेंनी केली. मुख्यमंत्री गुप्ता यांनी संपूर्ण प्रकरणाची गंभीर नोंद घेत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन खासदारांना दिले.
मुख्यमंत्री गुप्तांचा पोलिसांना फोन...
दरम्यान, यानंतर रेखा गुप्ता यांनी स्वतःच्या पोलिस आयुक्तांना फोन लावला. सुसाईड नोटचे पुरावे असताना कारवाई का केली नाही? असा सवाल त्यांनी पोलिस आयुक्तांना विचारला. आम्ही तपास करत असल्याचं पोलिस आयुक्तांनी सांगितले. त्यावर 22 दिवस झाले तरी तपास सुरूच आहे का? असा सवाल देखील रेखा गुप्ता यांनी पोलिस आयुक्तांना विचारला, अशी माहिती शौर्य पाटीलचे वडील प्रदीप पाटील यांनी दिली.
FAQs :
1. शौर्य पाटील प्रकरण काय आहे?
दहावीतील विद्यार्थी शौर्य पाटीलच्या मृत्यूशी संबंधित तपास आणि कारवाईतील विलंबामुळे हे प्रकरण गाजत आहे.
2. नीलेश लंके दिल्लीला का गेले?
पोलिसांनी गुन्हा नोंदवूनही कारवाई होत नसल्याने रेखा गुप्ता यांच्याकडे तातडीने हस्तक्षेपाची विनंती करण्यासाठी.
3. भेटीत काय चर्चा झाली?
प्रकरणातील विलंबाची कारणे, पुढील तपास आणि विद्यार्थ्याच्या कुटुंबाला न्याय मिळवण्यासाठी आवश्यक कारवाई.
4. या बैठकीत आणखी कोण उपस्थित होते?
खासदार भास्कर भगरे गुरुजी आणि राजाभाऊ वाजे.
5. पुढील पाऊल काय असू शकते?
दिल्ली सरकार आणि पोलिस प्रशासनाकडून तपासाला वेग येण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.