

Rakesh Kishor : सर्वोच्च न्यायालयात एका प्रकरणाची सुनावणी सुरू असताना राकेश किशोर नावाच्या एका वकिलाने भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यातील विविध ठिकाणी या घटनेविरोधात आंदोलन केलं.
त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार निलेश लंके यांनीही आज (दि.९) या घटनेचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. निलेश लंके थेट वकिल राकेश किशोर यांच्या घरी दाखल झाले. त्यांनी राकेश किशोर यांची भेट घेतली. यावेळी लंकेंनी संविधानाची प्रत व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो राकेश किशोर यांना भेट दिला. यातून कर्तव्याची जाणीव लकेंनी राकेश किशोर यांना करुन दिली.
निलेश लंकेंच्या या गांधीगिरीची सर्वत्र चर्चा होत आहे. लकेंनी शांततेत सरन्यायाधीश गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा वेगळ्यापद्धतीने निषेध केला. यावेळी लंके यांनी राकेश किशोर यांना संविधान लक्षात ठेवण्याचे आवाहनही केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही दोन दिवसांपूर्वी याविरोधात बारामतीत मूक आंदोलन केलं. बारामतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आलेल्या या आंदोलनात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह युगेंद्र पवार व पक्षाचे अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गवई यांच्यावर झालेला हल्ला हा देशाच्या इतिहासातील काळादिवस असल्याची टीका यावेळी सुप्रिया सुळेंनी केली.
तसेच आमदार रोहित पवार यांनीही संभाजीनगरात तर शशिकांत शिंदे यांनी मुंबईत आंदोलन केलं. रोहित पवार यांनी संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठासमोर संविधानाची उद्देशिका हाती घेत घोषणा दिल्या. या आंदोलनातही राष्ट्रवादी अनेक नेते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
दरम्यान सरन्यायाधीश गवई यांच्यावर बूट फेकून अशा पद्दतीने हल्ला केल्याच्या प्रकरणात वकील राकेश किशोर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण ऑल इंडिया अॅडव्होकेट्स असोसिएशनचे अध्यक्ष भक्तवचल यांच्या लेखी तक्रारीवरुन राकेश किशोर यांच्या विरोधात बंगळुरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंगळूरमधील विधान सौधा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.