India Vs Pakistan : पाकिस्तानने गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे भारतावर जोरदार ड्रोन हल्ला केला. पण प्रत्येक हल्ला भारताने परतवून लावत पाकची सर्व ड्रोन हवेतच नेस्तनाबूत केली. भारताने प्रत्युत्तर देताना पाकिस्तानतील चार ठिकाणी ड्रोन हल्ला केला. या हल्ल्यात पाकचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, पाककडून आपल्या नागरिकांचा ढाल म्हणून वापर केला जात असल्याची धक्कादायक माहितीही समोर आली आहे.
परराष्ट्र मंत्रालयाकडून शुक्रवारी पाकिस्तानच्या कुरापतींचा पर्दाफाश करण्यात आला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडकर व्योमिका सिंग यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. पाकिस्तानने गुरूवारी आणि शुक्रवारी रात्री ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांचा प्रमुख हेतू हा भारतील लष्कराच्या ठिकाणांची माहिती मिळवणे हा होता. पण भारताने हे हल्ले परतवून लावले आहेत.
भारतातील तब्बल 36 ठिकाणांना पाकिस्तानकडून टार्गेट करण्यात आले होते. जवळपास 300 ते 400 ड्रोनने हल्ला करण्यात आला होता. पण सर्व ड्रोन भारताने हवेतच निकामी केली. प्राथमिक माहितीनुसार, ही ड्रोन तुर्की बनावटीची आहेत. त्याची फॉरेन्सिक चाचणी केली जाणार असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या ड्रोनचा वापर निगराणी आणि हल्ल्यासाठीही केला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
पाकिस्तानकडून आपल्याच नागरिकांचा जीव धोक्यात घातला जात असल्याची माहितीही यावेळी मिस्त्री यांनी दिली. ता. 8 व 9 मेच्या रात्री पाकिस्तान लष्कराकडून अनेकदा भारतीय हवाई क्षेत्राचे उल्लंघन करण्यात आले. लष्कराच्या ठिकाणांना लक्ष्य करण्याचा त्यांचा हेतू होता. पाकने एलओसीवरही गोळीबार केला. तर दुसरीकडे लाहोत ते कराची नागरी विमानसेवा सुरूच ठेवून पाकने नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याचे मिस्त्री यांनी सांगितले.
पाकिस्तानकडून विमान प्रवाशांना ढाल करण्यात आले. भारताने संयम दाखवत नागरिकांचे नुकसान होणार नाही, याची दक्षता घेतल्याचेही मिस्त्री यांनी स्पष्ट केले. भारताकडून रात्री चार ड्रोन पाकिस्तानवर डागण्यात आली. त्यामध्ये पाकिस्तानचे मोठे नुकसान झाल्याचेही पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले. नागरी विमान सेवा बंद असती तर कदाचित भारताकडून आणखी हल्ले करण्यात आले असते.
भारताने धार्मिक स्थळांना लक्ष्य केल्याचा खोटा दावा पाकिस्तानकडून केला जात आहे. याउलट पाकिस्तानकडूनही पुंछमध्ये गुरुद्वारावर हल्ला करण्यात आल्याचे सांगत मिस्त्री यांनी पाकिस्तानचा बुरखा फाडला. तसेच पाकने सामान्य नागरिकांनाही टार्गेट केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.