New Delhi News : संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे, अशात आज एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक अशी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण देशालाच एकप्रकारे धक्का बसला. कारण, अधिवेशनात शून्य प्रहर सुरू असताना दोन तरूण थेट सभागृहात शिरले. एवढंच नाही तर त्यांनी सभागृहात स्मोक कँडलही पेटवल्या, यामुळे उपस्थित खासदारांमध्येही एकच गोंधळ उडाला आणि सभागृहात धूरमय वातावरण झाले.
या सर्व घटनेनंतर संबंधित दोन तरुणांना त्याच ठिकाणी पकडण्यात आले. याशिवाय संसदेच्या बाहेरील आवारातही अशाचप्रकारे काहींनी स्मोक कँडल पेटवल्याने संसदेच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे. तर हे संसद सभागृहात शिरलेले तरुण नेमके आत कसे काय आले, त्यांना कोणाचा पास मिळाला आदी अनेक प्रश्न उपस्थित झाले.
शिवाय दहशतवाद विरोधी पथकही संसद आवारात दाखल झाले. दरम्यान या प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणांची ओळख पटली असून, त्यांना संसदेत प्रवेशासाठी कोणाचा पास उपलब्ध झाला आदी माहितीही समोर आली आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
संसद सुरक्षा रक्षकांनी या घटनेत ताब्यात घेतलेल्या तरुणांपैकी सागर शर्मा याच्याकडे एक व्हिजिटर पास आढळून आला. ज्यावरून असे दिसून आले की, म्हैसूरचे भाजप(BJP) खासदार प्रताप सिम्हा यांच्या माध्यमातून त्याला पास उपलब्ध झाला होता. यामुळे आता हे खासदार सिम्हा नेमके कोण आहेत? याबाबत आपण जाणून घेऊयात.
प्रताप सिम्हा हे कर्नाटकातील म्हैसूर येथील भाजपचे खासदार आहेत. ते सलग दोनवेळा खासदार झाले असून, कर्नाटक भाजप युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष आहेत. राजकारणात येण्याअगोदर प्रताप सिम्हा पत्रकारही होते. 1999 मध्ये त्यांनी विजया कर्नाटका या कन्नड वर्तमानपत्रात प्रशिक्षणार्थी म्हणून पत्रकारितेचे करिअर सुरू केले होते. यानंतर त्यांनी विविध वर्तमानपत्रात लिखाण केले.
प्रताप सिम्हा यांचा जन्म कर्नाटकमधील हील स्टेशन्स पैकी एक असलेल्या सकलेशपूर येथे झाला होता. 2008 मध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांच्यावर एक चरित्र लिहिले होते, ज्याचे शीर्षक होते, ‘नरेंद्र मोदी: यारू थुलियादा हादी’ (Narendra Modi: The Untrodden Road)
वर्ष 2014 मध्ये त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती आणि विजयी झाले होते. यानंतर पुन्हा ते म्हैसूर येथून 2019 लोकसभा निवडणूक लढले आणि पुन्हा विजयी होत संसदेत पोहचले. प्रताप सिम्हा हे कट्टर हिंदुत्ववादी राजकारणासाठीही ओळखले जातात.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.