New Delhi News : मोदी सरकारचा महत्वाकांक्षी भारतातील पहिल्याच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावरुन सत्ताधारी-विरोधकांकडून सातत्यानं आरोप-प्रत्यारोप केले जात असतात. मात्र, या बहुचर्चित प्रकल्पाला विलंब होत आहे. मात्र,आता जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन होत असलेल्या विलंबावरुन गंभीर आरोप केले आहेत. तसेच या विलंबाला भारतातील मंत्री आणि अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहेत.
जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी बुधवारी(ता. 15 जुलै) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत भारतीय अधिकाऱ्यांवर करारातील आश्वासने वारंवार मोडल्याचा आणि चर्चेदरम्यान केवळ स्वतःच्या हिताचा विचार केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. त्यांनी या प्रकल्पाच्या विलंबाला पूर्णपणे भारतच जबाबदार असल्याचा ठपकाही ठेवला आहे.
माकिहारा यांनी सोशल मीडियावरील आपल्या पोस्टमध्ये भारतीय बाजूकडून आंतरराष्ट्रीय बैठका आणि चर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात बेफिकिरी दिसून आल्याचा गंभीर आरोपही केला आहे. तसेच भारतीय लोकं आश्वासने पाळत नाहीत. एकदा दिलेले आश्वासन लगेच बदलतात. शेवटपर्यंत फक्त स्वतःचा फायदा पाहतात. या प्रकल्पाची जबाबदारी असलेले मंत्री तर विशेषतः अत्यंत वाईट होते असा अनुभवही त्यांनी सांगितला आहे.
जपानी व्यावसायिक संकेतस्थळ टोयो केझाई ऑनलाइनवरील वरिष्ठ रेल्वे अभियंता इसाओ त्सुजिमुरा यांच्या लेखाला प्रतिसाद देताना जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी आपला अनुभव विशद केला आहे. "या प्रकल्पासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व जपानी लोकांच्या सन्मानासाठी मी स्पष्टपणे सांगतो की, हा प्रकल्प पुढे न जाण्याचं 100 टक्के कारण भारतीय बाजूच असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
तर दुसरीकडे दिल्लीत कार्यरत असलेले जपानी रेल्वे तज्ज्ञ इसाओ त्सुजिमुरा यांनी आपल्या लेखात म्हटले आहे की, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मूळ जपानी शिंकान्सेन मॉडेलपासून बऱ्याच प्रमाणात दूर गेल्याचा दावा केला आहे. ते म्हणतात, 2017 मध्ये मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या भूमिपूजनावेळी मोठा उत्साह होता. मात्र, 2023 पर्यंत सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट वास्तववादी नसल्याची जाणीव भारतीय अधिकाऱ्यांना आधीपासून असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
सुरुवातीला दोन्ही देशांनी जपानी मानकांनुसार प्रकल्प उभारण्याचा निर्धार केल्याचं म्हटलं आहे. भारतीय अधिकाऱ्यांनी या आरोपांना स्पष्टपणे नकार दिला आहे. दरम्यान, ANIने सरकारी सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, भारत आणि जपान यांच्यातील चर्चा सकारात्मक पद्धतीने सुरू असून प्रकल्पात सातत्याने प्रगती होत आहे.
जपानचे माजी न्यायमंत्री हिदेकी माकिहारा यांनी केलेल्या आरोपांना आता परराष्ट्र मंत्रालयाकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. त्यात "हे एक वैयक्तिक मत असून ते वस्तुस्थितीपेक्षा पूर्णपणे वेगळे असल्याचा दावा केला आहे. तसेच अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन रेल्वेबाबत भारत-जपान चर्चा चांगल्याप्रकारे सुरू असल्याचंही म्हटलं आहे.
जपान 2030 च्या दशकाच्या सुरुवातीला ई-20 ट्रेन मालिका पुरवणार असल्याचंही परराष्ट्र मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. त्याचवेळी अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन अजूनही विकासाच्या टप्प्यात आहे. बांधकाम वेगानं सुरू आहे. पहिला टप्पा 2027 मध्ये सुरू होईल. दोन्ही बाजूंनी भारतीय हाय-स्पीड बुलेट ट्रेन सुरू करण्यास सहमती दर्शवली असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
काँग्रेसचे खासदार पवन खेरा यांनी माकिहारा यांच्या आरोपांचा आधार घेत केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. X वर पोस्ट करताना ते म्हणतात, भारत-जपान शिंकान्सेन प्रकल्पात सहभागी राहिलेल्या माजी जपानी मंत्र्यांनी दावा केला आहे की, पंतप्रधान सनाए ताकाइची यांच्या भारत दौऱ्यानंतरही प्रकल्पात प्रगती झाली नाही. शिवाय, रेल्वे सुरक्षेसाठी महत्त्वाची असलेली सिग्नलिंग प्रणालीही जपानकडून दूर करण्यात आली."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.