Vishwas Nangare Patil: नागपूर शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरातील विविध चौकांमध्ये नाकेबंदी, विशेष तपासणी मोहीम तसेच वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकार्यांना आणि अंमलदारांना ‘सर्व्हिस गन’ बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश गुरूवारी (ता.१६) वॉकी-टॉकीद्वारे देण्यात आले.
शहरात नाकेबंदीवेळी गुन्हेगार, संशयित आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई करताना वाहतूक पोलीसांना अनेकदा प्रतिकार, धक्का बुक्की किंवा जीवाला धोका निर्माण होण्याच्या घटना घडतात. ही बाब लक्षात घेऊन वाहतूक पोलीसांना संरक्षण मिळावे आणि आपत्कालीन परिस्थितीत तातडीने प्रतिसाद देता यावा, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
यापूर्वी दोन दिवसांपूर्वीच पोलीस आयुक्तांनी वाहतूक शाखेतील सर्व अधिकारी आणि कर्मचार्यांनी ड्युटीदरम्यान 'नीट अँड क्लीन’ राहण्याचे निर्देश दिले होते. स्वच्छ गणवेश, शिस्तबद्ध वर्तन आणि नागरिकांशी सौजन्यपूर्ण संवाद यावर विशेष भर देण्यास सांगीतले होते. आता त्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ड्युटीदरम्यान ‘सर्व्हिस गन’ बाळगण्याचा निर्णय झाल्याने वाहतूक शाखेच्या कामकाजात आणखी शिस्त येणार असल्याचे मानले जात आहे.
शहरातील प्रमुख चौक, नाकेबंदी आणि विशेष बंदोबस्ता दरम्यान या आदेशाची तातडीने अंमल बजावणी केली जाणार असून, कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावी करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
नागपूर शहरात प्रत्यक्ष रस्त्यावर सुमारे ५२० वाहतूक पोलीस गस्त, वाहतूक नियंत्रण आणि अंमल बजावणीसाठी उपलब्ध असतात. शहरातील मंजूर पद संख्या ८४३ असली तरी साप्ताहिक सुट्ट्या, रजा, वैद्यकीय कारणे, बंदोबस्त आणि व्हीआयपी ड्युटीमुळे दररोज प्रत्यक्ष रस्त्यावर तैनात असलेली संख्या सुमारे ५२० पर्यंत मर्यादित राहते. शहरात २० लाखांहून अधिक वाहने आणि १७१ सिग्नल युक्त चौक आहेत.
एसीपी, डीसीपींनाही आदेश
दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्वच सहाय्यक पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही ‘सर्व्हिस रिव्हॉल्व्हर’ बाळगण्याचे आदेश दिले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पोलीसांवर हल्ले वाढले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी हे आदेश काढले असल्याचे समजते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.