Wrestler Bajrang Punia : कुस्तीपटू बजरंग पुनिया याने एक मोठा निर्णय घेतला आहे. “मी माझा पद्मश्री पुरस्कार प्रधानमंत्र्यांना परत करत आहे”, असे कॅप्शन लिहित बजरंगने एक पत्र एक्स या साईटवर पोस्ट केले आहे. दरम्यान, पुनिया पद्मश्री परत करण्यासाठी आज पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी भेटीसाठी वेळ न घेतल्याने भेट घेण्यास प्रशासनाने नकार दिला. त्यावर पुरस्कार तेथेच ठेवण्याचा प्रयत्न पुनिया यांनी केल्याने पोलिसांनी त्यांची समजुत काढण्याचा प्रयत्न केला.
त्यामुळे आंदोलनकारी कुस्तीपटूंमध्ये पुन्हा एकदा नाराजी पसरल्याचे चित्र आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांचे सहकारी संजय सिंह यांनी अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. संजय सिंह अध्यक्ष होताच बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक आणि विनेश फोगाटने नाराजी व्यक्त केली आहे. या तिघांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाचे नेतृत्व केले होते.
भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी दि. 22 डिसेंबर रोजी निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला. एकूण 47 जणांनी या निवडणुकीत मतदान केलं. यापैकी 40 मतं संजय सिंह यांच्या पारड्यात पडली तर अनिता यांना केवळ सात मतं मिळाली.
कुस्तीपटू बजरंग पुनियाने आपल्या पत्रात लिहिले, “आशा आहे की, तुमची प्रकृती चांगली असेल. तुम्ही देशाच्या सेवेमध्ये व्यस्त असणार. तुमच्या व्यस्ततेदरम्यान मी आपले लक्ष कुस्तीकडे वळवू इच्छितो. आपल्याला माहितच आहे की, यावर्षी जानेवारी महिन्यात भारतीय महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्या महिला कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले, तेव्हा मीही त्यात सहभागी झालो होतो. सरकारने आंदोलकर्त्यांना ठोस आश्वासन दिल्यानंतर जानेवारी महिन्यातच कुस्तीपटू आपापल्या घरी निघून गेले. मात्र तीन महिन्यानंतरही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआरही दाखल झाला नव्हता.” “एप्रिल महिन्यात कुस्तीपटूंनी पुन्हा एकदा आंदोलन केले. तरही ब्रिजभूषण सिंह यांच्यावर एफआयआर दाखल झाला नाही.
शेवटी कुस्तीपटूंना न्यायालयात जाऊन एफआयआर दाखल करावा लागला. जानेवारीमध्ये तक्रारदार महिलांची संख्या 19 होती, जी एप्रिल महिना येईपर्यंत 7 राहिली. म्हणजे केवळ तीन महिन्यात ब्रिजभूषण सिंहने आपल्या ताकदीच्या जोरावर 12 महिलांना न्याय मिळण्यापासून अडवले. आमचे आंदोलन 40 दिवस चालले या दिवसांत आणखी एक महिला मागे हटली.
आमच्यावर खूप दबाव टाकला गेला. आंदोलन करू नये म्हणून दिल्लीच्या बाहेर काढण्यात आले”, असे पुढे पत्रात म्हटले. आमच्यावर दबाव सातत्याने वाढत असल्यामुळे आम्ही आमचे पदक गंगा नदीत वाहण्याचा निर्णय घेतला. आम्ही पदक गंगेत सोडायला गेलो तेव्हा आमचे प्रशिक्षक आणि शेतकरी नेत्यांनी आम्हाला अडवले.
यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आमच्याशी संवाद साधला. त्यात त्यांनी महिला कुस्तीपटूंना न्याय देण्याचा शब्द दिला होता. तसेच कुस्ती महासंघातून ब्रिजभूषण सिंह, त्यांचे कुटुंब आणि त्यांच्या साथीदारांना बाहेर करू, असेही आश्वासन दिले होते. अमित शाह यांचे ऐकून आम्ही आमचे आंदोलन समाप्त केले.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.