
President Droupadi Murmu, Kerala helicopter incident : केरळच्या दौऱ्यावर असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याचे समोर आले आहे. त्यांच्या हेलिकॉप्टरची मोठी दुर्घटना टळली असून राष्ट्रपती थोडक्यात बचावल्या आहेत. केरळमधील एका हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरताच त्याच एक चाक जमिनीत रुतले. त्यामुळे काही काळ संपूर्ण यंत्रणा हादरली होती.
राष्ट्रपती मुर्मू या मंगळवारपासून चार दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आहेत. आज त्या सबरीमाला येथे दाखल झाल्या. त्यांचे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर उतरविण्यात आले, ते आयत्यावेळी तयार करण्यात आले होते, अशी माहिती आता समोर आली आहे. हेलिपॅडच्या काँक्रीटीकरणाचे काम बुधवारी सकाळीच पूर्ण झाले होते. मंगळवारी सायंकाळी हे काम सुरू झाले होते.
हेलिपॅडसाठी रात्री काँक्रीट टाकण्यात आले होते. पण राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर लँडिंग होण्याच्या वेळेपर्यंत ते सुकले नाही. राज्याच्या गुप्तचर विभागाने याबाबत सतर्क केले होते. या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवू नये, असे सुचित करण्यात आल्याचा दावा आता केला जात आहे. पण त्यानंतरही या हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरविण्यात आले आणि दुर्घटना घडली.
हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताच त्याच्या वजनामुळे एक चाक जमिनीत रुतले. त्यानंतर राष्ट्रपती पुढच्या दौऱ्यासाठी निघून गेल्या. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रुतलेले हेलिकॉप्टर काढण्यासाठी मदत केली. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दरम्यान, पहाटे चार वाजेपर्यंत राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर या हेलिपॅडवर उतरणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळे पोलिसांनी रस्ते मार्गावर ठिकठिकाणी सुरक्षाव्यवस्था तैनात केली होती.
दरम्यान, राष्ट्रपतींच्या सुरक्षेतील या गंभीर चुकीमुळे प्रशासन हादरले आहे. हेलिपॅड तयार करण्यास विलंब का झाला, दौरा अचानक ठरला का, याबाबत योग्य समन्वय झाला नाही का, यामध्ये नेमकी कुणाची चूक, याची चौकशी आता सुरू झाली आहे. राष्ट्रपती मुर्मू आज सबरीमाला येथील भगवान अयप्पा मंदिरात पूजा करणार आहेत. या मंदिरात पूजा करणाऱ्या त्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.