

New dehli News : केंद्र सरकारला जो संदेश द्यायचा होता, तो आम्ही पाठवला आहे. हा फक्त एका राजकीय पक्षाचा आवाज नाही, हा केवळ नेत्यांचा आवाज नाही; तर हा भारतातील तरुणांचा आवाज आहे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा आवाज आहे. हा आवाज सांगतोय की, आम्ही भारतात लोकशाहीचा अंत होऊ देणार नाही. आम्ही संविधान नष्ट होऊ देणार नाही. तुम्ही स्वतःला कितीही मोठे समजा, तुमच्याकडे कितीही पैसा असो, ताकद असो, तुम्ही कोणीही असलात तरी तुम्ही संविधानापेक्षा मोठे नाही; संविधान तुमच्यापेक्षा मोठे आहे, असा स्पष्ट इशारा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी रामलीला मैदानावरून बोलताना दिला.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या रामलीला मैदानावर इंडिया आघाडीने रविवारी विराट मोर्चा काढला. यावेळी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव, संजय राऊत उपस्थित होते. राहुल गांधी म्हणाले, 'या देशात गेल्या अनेक वर्षांपासून मतांची चोरी केली जात आहे. ममताजींनी बंगालचे उदाहरण दिले. मध्य प्रदेश, हरियाणा, छत्तीसगड, महाराष्ट्र, कर्नाटक आणि २०२४ ची लोकसभा... या सर्व निवडणुकांमध्ये मते चोरली गेली आहेत. ईव्हीएमच्या (EVM) माध्यमातून मतांची चोरी झाली आहे; मतदारयादीतून नावे वगळून मतांची चोरी झाली आहे.'
"2024 च्या निवडणुकीनंतर तब्बल 13.5 कोटी मतदारांची नावे मतदारयादीतून हटवण्यात आली. याचा अर्थ एवढ्या मोठ्या संख्येने मतदारांना मतदानापासून वंचित ठेवले गेले. दर सात मतदारांमागे एका मतदाराला बाहेर काढले गेले; म्हणजेच भारतातील 15 टक्के मतदारांची नावे 2024 च्या निवडणुकीनंतर मतदार यादीतून गायब करण्यात आली. 2024 च्या निवडणुकीत 'एनडीए' (NDA) आणि आमच्यात अवघ्या 3 टक्क्यांचा फरक होता. त्यानंतर लगेच 15 टक्के मतदारांना यादीतून बाहेर फेकण्यात आले. याचाच अर्थ 2024 ची निवडणूक ही बेकायदेशीर निवडणूक होती, ती चोरीची निवडणूक होती; आणि हे मी सांगत नसून खुद्द निवडणूक आयोगच आपल्या कृतीतून सांगत आहे, कारण त्यांनीच 2024 च्या यादीतून 13.5 कोटी मतदार हटवले असल्याचे राहुल गांधी म्हणाले.
आम्ही प्रेमाने काम करणार आहोत. आम्ही पीएम मोदी किंवा अमित शहा यांचा द्वेष करीत नाहीत. ज्ञानेश कुमार यांनी मोठी चोरी केली आहे. त्यांनी देशाचा गळा घोटण्याचे काम केले आहे. त्यामुळे येत्या काळात आम्ही लोकशाही संपू देणार नाही, असेही यावेळी राहुल गांधी म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.