Rajasthan News: दिल्लीत रुबाब, गल्लीत पराभव! राजस्थानच्या निकालात गेहलोत-पायलटांसह शेखावतांनाही धक्का

Rajasthan Mahapalika Election 2026 Results: राजस्थानच्या महानगरपालिका निवडणुकीत दिग्गज नेत्यांना मतदारांनी धक्का दिला. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या वॉर्डात काँग्रेसचा पराभव झाला, तर गजेंद्र सिंह शेखावतांच्या वॉर्डात भाजपला हार पत्करावी लागली.
Rajasthan Mahapalika Election Results
Rajasthan Mahapalika Election ResultsSarkarnama
Published on
Updated on

जयपूर : राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे निकाल अनेक दिग्गज नेत्यांसाठी धक्कादायक ठरले आहेत. स्वतःच्या प्रभावक्षेत्रात पक्षाला विजयी करण्यात अनेक नेत्यांना अपयश आले आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सचिन पायलट यांच्या वॉर्डात काँग्रेसचा पराभव झाला आहे. दुसरीकडे केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या वॉर्डातही भाजपला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या निकालांची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

गेहलोत-पायलट यांच्या वॉर्डात काँग्रेसला धक्का

अशोक गेहलोत जोधपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ८८ मध्ये राहतात. या वॉर्डात भाजपने विजय मिळवत काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसचा प्रभाव असलेल्या भागातच पक्षाला पराभव पत्करावा लागल्याने हा निकाल विशेष चर्चेत आला आहे.

जयपूर महापालिकेच्या वॉर्ड क्रमांक ९७ मध्ये सचिन पायलट यांचे वास्तव्य आहे. या वॉर्डातही भाजपच्या उमेदवाराने विजय मिळवला. मात्र, पायलट यांच्या टोंक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला चांगले यश मिळाले आहे.

शेखावतांच्या वॉर्डात भाजपचा पराभव

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या जोधपूर महापालिकेतील वॉर्ड क्रमांक ५६ मध्ये भाजपला पराभवाचा सामना करावा लागला. या ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपचा पराभव केला. त्यामुळे राजस्थानच्या राजकारणात भाजपसाठीही हा निकाल महत्त्वाचा मानला जात आहे.

काँग्रेसचे विरोधी पक्षनेते टीकाराम जूली आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्या वॉर्डातही काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. म्हणजेच काँग्रेसच्या चार प्रमुख नेत्यांच्या वॉर्डात पक्षाला विजय मिळवता आलेला नाही.

Rajasthan Mahapalika Election Results
Pimpri Police : ‘मा. आमदार, महाराष्ट्र राज्य’ स्टिकर लावून फिरत होता; पोलिसांनी गाडी थांबवताच सगळा तोरा उतरला!

भाजपच्या दिग्गजांनाही धक्का

भाजपच्या अनेक नेत्यांच्या प्रभावक्षेत्रातही पक्षाला अपेक्षित कामगिरी करता आलेली नाही. केंद्रीय राज्यमंत्री भागीरथ चौधरी, कॅबिनेट मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड, मंत्री मदन दिलावर आणि जोराराम कुमावत यांच्या वॉर्डात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष मदन राठोड यांच्या प्रभावक्षेत्रातील पालीमध्येही भाजपला धक्का बसला आहे. तर राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या गडातील झालावाडमध्ये भाजपला बहुमत मिळाले नाही. येथे काँग्रेसने तब्बल ३९ वॉर्ड जिंकले, तर भाजपला केवळ १३ वॉर्डांवर समाधान मानावे लागले.

Rajasthan Mahapalika Election Results
पोस्ट ऑफिसचा 'हा 1 नियम' बदलेल तुमचं भविष्य; जाणून घ्या 15x5x5 चे गणित

भरतपूरमध्ये अपक्ष ठरले किंगमेकर

मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या गृहजिल्ह्यातील भरतपूर महापालिकेतही भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. भाजपने २० वॉर्ड जिंकले, तर काँग्रेसला केवळ ७ जागा मिळाल्या. मात्र, अपक्षांनी तब्बल ३६ वॉर्ड जिंकत सत्ता स्थापनेची किल्ली आपल्या हातात ठेवली आहे. बसपा आणि आरएलपीला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.

एकूणच, राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांतील दिग्गजांच्या प्रभावक्षेत्राबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. स्वतःच्या वॉर्डात पक्षाला विजय मिळवून देता न आल्याने आगामी राजकारणात या निकालांचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com