
New Delhi News : काँग्रेसच्या गुजरातमध्ये झालेल्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये अनेक नेत्यांची तडाखेबंद भाषणे झाली. अनेक नेत्यांनी पक्षसंघटनेतील उणिवा जाहीरपणे सांगितल्या. त्याचप्रमाणे पक्षप्रती प्रामाणिक नसलेल्या नेत्यांविरोधातही आवाज उठवला. एका महिला नेत्याने तर राहुल गांधींविरोधात काम करणारे पक्षातच गद्दार असल्याचे विधान केले आहे.
अधिवेशनात पक्षाने देशभरातील अनेक नेत्यांना बोलण्याची संधी दिली. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, माजी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह देशभरातील नेते उपस्थित होते. त्यांच्यावर अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या मनातील भावना परखडपणे मांडल्या.
राजस्थान महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा रेहाना रियाज चिश्ती यांनी पक्षातील गद्दारांवर भाष्य केले. त्या म्हणाल्या, राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी पदयात्रा केली. त्यांच्यासोबत जनता चालत होती. पण तरीही आपण फेल होतो. आमचा नेता दिवस-रात्र, चोवीस तास काम करत आहे. पण ते फेल व्हावेत असे कुणाला वाटते? आपल्यामध्ये डोकावून पाहायला हवे. आपल्यात गद्दार आहेत, जे आपल्या नेत्याला फेल करू इच्छित आहेत, हे शोधायला हवे.
राहुल गांधी दिवसरात्र काम करूनही त्यांना जे हवे ते मिळत नाही. काँग्रेसप्रती जे प्रामाणिक नाहीत, पक्षाला पुढे जाऊ देत नाही, जिल्हा आणि प्रदेशात बसले आहेत, केवळ स्वत:च विचार करत आहेत. त्यांना एकदाचं काढून टाका. तुमच्या मागे, गांधी कुटुंबाच्या मागे, काँग्रेसच्या विचारधारेमागे लोक उभे आहेत. काँग्रेसला मजबूत करणाऱ्या कार्यकर्त्यांना पुढे आणा, अशी अपेक्षाही चिश्ती यांनी व्यक्त केली.
उत्तर प्रदेशातील काँग्रेसच्या एका नेत्याने एक किस्सा सांगत नेत्यांची झोप उडवली. 1982 पासून काँग्रेसमध्ये आहे. आम्ही लोक भाजपशी नंतर लढतो, काँग्रेसमधील लोकच आधी लढत असतात. तुम्ही काँग्रेसमधील भाजपच्या लोकांना हटवू इच्छिता. पण जर एखाद्या शहराध्यक्षाचा एक मुलगा समाजवादी पक्षात आणि एक मुलगा भाजपमध्ये असेल तर तो शहराध्यक्ष बनण्याच्या लायकीचा आहे का, असा सवाल या नेत्याने केला.
शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना निवडणूक लढता येणार नाही, हाही निर्णय घ्या, नाहीतर प्रत्येक शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष स्वत:च उमेदवार असतील, अशी अपेक्षाही त्यांनी केली. खर्गे यांनी आपल्या भाषणादरम्यान उमेदवार निवडीच्या प्रक्रियेत जिल्हाध्यक्षांना महत्व असेल, असे स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.