
Marathi Letter: मराठीच्या अस्मितेसाठी आज मीरा-भाईंदर शहरात मराठी जनतेनं आपली प्रचंड ताकद दाखवून दिली. सातत्यानं या मुद्द्यावरुन माघार घ्यावी लागत असल्यानं राज्यातील भाजप्रणित महायुती सरकार बॅकफूटवर गेलं आहे. यापार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्वाचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याबाबतचा एक आदेशच थेट केंद्रीय गृहमंत्रालयातून निघाला आहे. त्यामुळं भाजपसाठी हा थोडासा दिलासा मानला जात आहे.
भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतंच ट्विट केलं असून यात त्यांनी म्हटलं की, समस्त मराठी भाषिकांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे की, मराठी पत्रांना मराठीतच उत्तर देण्याचा अतिशय महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीनं घेण्यात आला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा घोषित करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं माय मराठीचा अगोदरच गौरव केला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या कामकाजात करण्यात येणाऱ्या या क्रांतिकारी बदलाचा प्रत्येक मराठी भाषिक आनंदाने स्वागत करतो आहे. हा महत्वाचा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचे मनःपूर्वक आभार.
दरम्यान, मराठी अस्मितेचा मुद्दा सध्या महाराष्ट्रात चांगलाच गाजतो आहे. फडणवीस सरकारनं हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची केल्याचा दोन महिन्यांपूर्वी जीआर काढला. त्यानंतर याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. याविरोधात सोशल मीडियावर विविध स्तरातले लोक व्यक्त व्हायला लागले. यामध्ये लेखक, विचारवंत, पत्रकार, राजकीय व्यक्ती या सर्वांचा समावेश होता. मोठा दबाव वाढत असल्यानं सरकारनं नंतर या जीआरमध्ये सुधारणा करुन अनिवार्य ऐवजी सर्वसाधारण हा शब्द टाकून पुन्हा दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला.
पण त्यानंतर याविरोधात मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेतला. एकीकडं सरकारचा हा निर्णय कसा चुकीचा आहे? हे सामाजिक आणि बालमानशास्त्राच्या दृष्टीनं सांगण्याचा प्रयत्न करत होते. तर दुसरीकडं राज ठाकरे सरकारवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळं सरकारला अखेर दोन्ही जीआर रद्द करण्याची घोषणा करावी लागली.
त्यानंतर हे जीआर रद्द झाल्याबद्दल मराठी विजयाचा मेळावा मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांनी एकत्रितपणे वरळीत घेतला. या निमित्त दोघे भाऊ आश्चर्यकारकरित्या एकत्रही आले. त्यामुळं दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांमध्ये तसंच मराठी जनतेमध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलं. त्यानंतर आज मीरा-भाईंदर शहरात मनसे आणि मराठी एकीकरण समितीच्यावतीनं आयोजित मोर्चामध्ये देखील मराठी जनतेनं विक्रमी संख्येनं हजेरी लावली. सहाजिकच मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाची सहानुभूती विरोधात असलेल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना मिळत असल्यानं भाजपप्रणित महायुती सरकार बॅकफूटवर पडत असल्याचं दिसून आलं.
यापार्श्वभूमीवर भाजपच्या नेत्यांकडून पंतप्रधानांनी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याचं सांगितलं जात आहे. तसंच मुख्यमंत्र्यांनी नुकतंच 'महाराष्ट्र धर्म' नावाचं पॉडकास्टही सुरु केलं आहे. त्यानंतर आता थेट केंद्र सरकारकडून मराठीतून आलेल्या पत्रांना मराठीतूनच उत्तर देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.