Patna : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते व विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची मंगळवारी भेट झाली. तब्बल आठ महिन्यानंतर हे दोन्ही नेते भेटल्याने चर्चांना उधाण आले आहे. पुढील काही महिन्यांत राज्यात विधानसभेची निवडणूक आहे. त्याआधी ही भेट झाल्याने तर्कवितर्क लढवले जात आहेत.
लोकसभा निवडणुकीआधी नितीश कुमार यांनी भाजपविरोधात इंडिया आघाडी मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. पण काही दिवसांतच त्यांनी पलटी मारत आरजेडीसोबतची आघाडी तोडली. हे दोन्ही पक्ष बिहारमध्ये सत्तेत होते. पण आघाडीतून बाहेर पडत त्यांनी भाजपसोबत जात पुन्हा सरकार स्थापन केले. त्यानंतर एकदाही दोन्ही नेत्यांची भेट झालेली नव्हती.
तब्बल आठ महिन्यांनंतर हे दोन्ही नेते मंत्रालयात एकत्र आले. यामागचे कारण माहिती आयुक्तांची नियुक्ती असल्याचे सांगितले जात आहे. मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते या दोघांच्या संमतीने आयुक्तांचे नाव निश्चित केले जाते. या समितीचे अध्यक्ष मुख्यमंत्री असतात. या समितीमध्ये विरोधी पक्षनेते असतात. त्याचप्रमाणे आरक्षणाच्या मुद्यावरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मीडियाशी बोलताना तेजस्वी यादव म्हणाले, माहिती आयुक्तांच्या नियुक्तीची माहिती दिली जाईल. नवव्या अनुसूचीच्या मुद्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा झाली आहे. त्यांना आरक्षणाचा मुद्दा कोर्टात असल्याचे सांगितले. त्यावर आम्हीही कोर्टात गेल्याचे त्यांना सांगितले. तसेच तुम्ही तुमचे म्हणणे कोर्टात मांडा, आम्हीही चांगल्या पध्दतीने म्हणणे मांडू, असे तेजस्वी यांनी स्पष्ट केले.
तेजस्वी यादव आणि नितीश कुमार सत्तेत असताना त्यांच्या सरकारने राज्यात आरक्षणाची मर्यादा वाढवली होती. मात्र, उच्च न्यायालयाने आरक्षणावर फुली मारली. त्यावरून सध्या राज्यात राजकारण तापले आहे. संविधानातील नवव्या अनुसूचीनुसार वाढीव आरक्षणाला मान्यता दिली जाऊ शकते. निवडणुकीच्या तोंडावर हा मुद्दा तापण्याची शक्यता असल्याने नितीश कुमारांचाही त्यासाठी आग्रह आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.