Madhya Pradesh News : मध्य प्रदेशमध्ये भाजपचे सरकार सत्तेवर आले असून, मुख्यमंत्रिपदाची माळ मोहन यादव यांच्या गळ्यात पडलेली आहे. मात्र तरीही मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे विधानसभा निवडणूक निकालापासून त्यांच्या विविध विधानांमुळे चर्चेत दिसत आहेत.
याच पार्श्वभूमीवर आता शिवराजसिंह चौहान यांचं एक विधान चर्चेत आलं आहे. 'कधी-कधी व्यक्ती राजतिलकाची प्रतीक्षा करता-करता वनवासात पोहोचतो,' असं त्यांनी म्हटलं आहे. आता त्यांनी हे विधान नेमकं कोणाबद्दल केलं आणि कोणत्या हेतूने केलं, यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिवराजसिंह चौहान हे मध्य प्रदेशचे चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. यंदाही राज्यात भाजपचे सरकार पुन्हा यावे, म्हणून त्यांनी जोरदार काम केलं होतं. विविध नवीन योजना आणून मतदारांना भाजप सरकारकडे खेचल्याचं निवडणूक निकालातून दिसून आलं होतं.
एक्झिट पोलच्या अंदाजानुसार मध्य प्रदेशात भाजपचं सरकार येणं अवघड मानलं जात होतं, परंतु सर्व अंदाज फोल ठरवत भाजपने पुन्हा सत्ता मिळवली. त्यात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचा मोठा वाटा होता. त्यामुळे स्वाभाविकच मुख्यमंत्रिपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार, असं बोललं जात होतं. मात्र भाजपने धक्कातंत्र वापरत मुख्यमंत्रिपदी मोहन यादव (Mohan Yadav) हा नवीन चेहरा निवडला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्या क्षणापासून शिवराजसिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) काहीसे दुखावले गेल्याचे आणि नाराज असल्याचे त्यांच्या देहबोलीवरून आणि विधानांवरून दिसत आहे. त्यांच्या कुटुंबीयांनाही हा धक्का सहन झाला नसल्याचे दिसून आले होते. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी आपल्या बुधनी विधानसभा मतदारसंघातील शाहगंज येथे एका सभेत बोलताना ते भावूक झाले. त्यांनी म्हटले की, ते नेहमीच त्यांच्या लोकांमध्ये विशेषकरून त्यांच्या भगिनींमध्ये राहतील.
यावेळी उपस्थिती नागरिकांमधील काही महिलांनी, 'भाऊ आम्हाला एकटं सोडून कुठंही जाऊ नका,' अशी विनवणी केली. तेव्हा शिवराजसिंह चौहान यांनी 'मी कुठेही जाणार नाही. मी इथेच जगणार आणि इथेच मरणार...' असा भावनिक प्रतिसाद दिला.
यावेळी शिवराजसिंह चौहान असेही म्हणाले की, मागील भाजप (BJP) सरकारकडून सुरू करण्यात आलेली सर्व कामे, विद्यमान सरकार पूर्ण करेल. ज्यामध्ये लाडली बहना योजना, या योजनेतील लाभार्थींसाठी घरकुल योजना, प्रत्येक कुटुंबात एक नोकरीची योजना आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या आश्वासनांचा समावेश आहे.
याचबरोबर शिवराजसिंह चौहान यांनी सभेला संबोधित करताना म्हटले की, नवीन सरकार ही सर्व कामे पुढे घेऊन जाईल. कुठं ना कुठं काहीतरी मोठा उद्देशही असेल. कधी कधी राज्याभिषेकाची वेळ तोपर्यंत व्यक्ती वनवासातही पोहोचतो. परंतु हे सर्व कोणत्या ना कोणत्या उद्देशाच्या पूर्ततेसाठी असते. त्यांनी म्हटले, की विद्यमान सरकार या सर्व योजना लागू करेल, कारण राज्यात काँग्रेसचे नव्हे, तर भाजपचे सरकार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.