

Sonam Wangchuk : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी नीट पेपरफुटीविरोधात आपले उपोषण 26 व्या दिवशी मागे घेतलं. उपोषण संपवल्यानंतर आता त्यांनी एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ज्यात ते काहीसे संतप्त झाल्याचे पाहायला मिळाले आहेत.
सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडल्यानंतर सोशल मीडियावर त्याविषयी अनेकांनी प्रश्न उपस्थितीत केले. सोनम वांगुचक यांना ट्रोल केलं गेलं. त्या सगळ्या ट्रोलर्सना सोनम वांगचुक यांनी आपल्या व्हिडीओतून जोरदार उत्तर दिलं आहे. मला डील करायची असती तर मी २६ दिवस उपाशी राहिलो नसतो, असा संताप सोनम वांगुचक यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, हा व्हिडिओ मी थोड्या दुःखाने आणि थोड्या रागाने बनवत आहे. माझ्या देशातील भाऊ-बहिणींसाठी व विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी मी २६ दिवस उपाशी राहिलो. ज्यात, माझं तब्बल ११ किलो वजन कमी झालं. माझं शरीर खचलं, मसल्स कमी झाले. माझ्या अवयवांवर आणि मेंदूवर अपरिवर्तनीय (इररिव्हर्सिबल) नुकसान होण्याची वेळ जवळपास आली आहे. लडाखच्या कडाक्याच्या थंडीतून दिल्लीच्या कडक उन्हात मी उपोषण केलं. हे सर्व केल्यानंतरही माझं उपोषण किती प्रामाणिक होतं, हे सिद्ध करावं लागणार आहे का? याचं चारित्र्य प्रमाणपत्र मला आता कोणाकडून घ्यावं लागणार आहे का?
उपोषण केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते सोडल्याचा आरोप करणाऱ्यांनाही त्यांनी यावेळी सडेतोड उत्तर दिले. मी उपोषण सोडलं तर का सोडलं. कुणाच्या हातून सोडलं? काय डील झाली, काय सौदा झाला? मला या सगळ्याची उत्तरे द्यावी लागणार आहेत का असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थितीत केला.
मी कालपासून आता द्रव पदार्थ पीत आहे, ज्यामुळे मला थोडी ऊर्जा मिळाली आहे. परंतु दुर्दैवाने ती उर्जाही मला अशाप्रकारे वापरावी लागत आहे. सकाळपासून लोक मला फोन करत आहेत किंवा पोस्ट दाखवत आहेत, आणि म्हणत आहेत, 'तुमच्याबद्दल खूप प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तुम्ही केंद्रीय मंत्र्यांकडून उपोषण का सोडला? तुम्ही दुसऱ्या कोणाकडून का नाही सोडला?
'धिक्कार असो'...
काय डील झाली, काय सौदा झाला असं विचारलं जात आहे. मला जर सौदा करायचा असता, तर मी 26 दिवस उपाशी का राहिलो असतो? किती लोकांनी असे सौदे केले आहेत? ते असेच सौदे करतात का? आलिशान खोल्यांमध्ये बसून सौदे केले जातात. सौदाच करायचा होता तर मी आलिशान ठिकाणी सौदा करु शकलो नसतो का? दिल्लीच्या इतक्या कडक उन्हात रस्त्याच्या कडेला बसून मी कशाला डील करेल.
"अशा देशाचा धिक्कार असो, जिथे अशा प्रकारच्या विकृत विचारांची निर्मिती होते. जिथून इतके नीच आणि घृणास्पद विचार बाहेर येतात. मात्र मी तुम्हाला दोष देत नाही... कारण तुमच्यापैकी बहुतेकांना वस्तुस्थितीची माहिती नाही. त्या वेळी परिस्थिती नेमकी कशी होती, हे तुम्हाला माहीत नाही."
उत्तर कोरिया सारखी परिस्थितीत...
"सोनम वांगचुक यांनी सफदरजंग रुग्णालयात कोणत्या परिस्थितीत राहावे लागले, याबाबतचा अनुभव सांगितला. ते म्हणाले, "ते रुग्णालय म्हणजे अक्षरशः छावणीच बनले होते. प्रत्येक गोष्टीवर निर्बंध होते. खोलीबाहेरही जाता येत नव्हते. तिथे एखादा पक्षीसुद्धा सहज फिरकू शकत नव्हता. आमच्या खोलीत कोणालाही भेटण्याची परवानगी नव्हती. मी कसाबसा नॅपकिन पेपरवर लिहून तुमच्यापर्यंत संदेश पोहोचवत होतो. ते संदेशही अनेकदा जप्त केले जात होते. मला भेटण्यासाठी लडाखहून आलेल्या माझ्या नातेवाईकांनाही परत पाठवण्यात आले. हे सगळं पूर्णपणे बेकायदेशीर होतं. एक प्रकारे तिथली परिस्थिती उत्तर कोरियासारखी झाली होती."
पत्नी गीतांजली यांच्याबद्दल काय म्हणाले?
या काळात संपूर्ण प्रकरण हाताळण्यासाठी पत्नी गीतांजली यांनी दाखवलेल्या सूजबूज आणि धैर्याचेही सोनम वांगचुक यांनी कौतुक केले.
ते म्हणाले, "माझी पत्नी गीतांजली यांच्या सूजबूजेमुळे आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच रविवारी (१९ जुलै) देखील दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी झाली. त्या सुनावणीत अखेर न्यायालयाने स्पष्ट केले की, मी कोणत्याही रुग्णालयात जाऊ शकतो आणि मी एक स्वतंत्र नागरिक आहे."
ते पुढे म्हणाले, "मात्र त्या दिवशीही मला कोणत्या परिस्थितीत राहावे लागले, याची तुम्हाला कल्पना नाही. दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश आल्यानंतरही मला सफदरजंग रुग्णालयातून बाहेर जाऊ दिले गेले नाही."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.