नवी दिल्ली : राजस्थानचे (Rajasthan) मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) आणि सचिन पायलट (Sachin Pilot) यांच्यातील वादावर तोडगा निघाला आहे. राजस्थानमधील मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटला असून, पायलट समर्थकांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार आहे. यासाठी तीन विद्यमान मंत्र्यांनी राजीनामा दिला असून, त्याजागी पायलट समर्थकांची वर्णी लागणार आहे. उद्या (ता.21) सायंकाळी 4 वाजता मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
गेहलोत यांनी मंत्रिमंडळाची तातडीने बैठक आज सायंकाळी 5 वाजता बोलावली आहे. पक्षाचे प्रभारी अजय माकन हेसुद्धा जयपूरमध्ये दाखल झाले आहेत. शिक्षणमंत्री व प्रदेशाध्यक्ष गोविंदसिंह डोटासरा, महसूलमंत्री व पंजाब प्रभारी हरीश चौधरी आणि आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी राजीनामा दिल्याचे समजते. एक पद, एक व्यक्ती या तत्वानुसार हे राजीनामे घेण्यात आले आहेत. आता पायलट समर्थकांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार उद्या सायंकाळी 4 वाजता होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मंत्रिमंडळ विस्तार मार्गी लागल्यानंतर अखिल भारतीय काँग्रेस समितीमधील रिक्त पदे भरण्यास सुरवात होणार आहे. पायलट यांच्यावर सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवली जाणार आहे. सध्या रणदीप सुरजेवाला यांच्याकडे माध्यम प्रभारी, कर्नाटकचे प्रभारी सरचिटणीस अशी जबाबदारी आहे. काँग्रेसमध्ये सध्या एक व्यक्ती एक पद हे सूत्र स्वीकारण्यात आले आहे. पायलट यांना सरचिटणीस केल्यास त्यांच्यावर कोणत्या राज्याची जबाबदारी दिली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, त्यांच्यावर गुजरातची धुरा सोपवली जाईल, अशी चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील मंत्रिमंडळाचा विस्तार आणि सरकारी महामंडळांवरील नियुक्त्या याबाबत सोनिया गांधींनी गेहलोत यांना आदेश दिले होते. यानंतर तातडीने पायलट यांना सोनिया गांधींनी भेटीसाठी बोलावले होते. पायलट यांच्या समर्थकांना मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळांवरील नियुक्त्यांमध्ये स्थान देण्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली होती. पायलट यांनी वर्षभरापूर्वी पुकारलेल्या बंडानंतर त्यांना काही आश्वासने देण्यात आली होती. ही आश्वासने मिळाल्यानंतर पायलट यांनी बंडाची तलवार म्यान केली होती. आता पक्षाने ही आश्वासने पूर्ण करण्याच्या दिशेने पावले टाकली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.