

UP Assembly Election 2027 : देशात राजकीयदृष्ट्या सर्वात महत्वाचे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्यासाठी भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली कंबर कसली आहे. मात्र पक्षांतर्गत सर्व्हेने पक्षातील नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भाजपमधील तब्बल १२५ आमदार डेंजर झोनमध्ये असल्याची धक्कादायक माहिती सर्व्हेतून समोर आली आहे. NDTV ने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपने नुकताच आमदारांचे काम आणि लोकप्रियतेबाबत सर्व्हे करत लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यानुसार ४०३ मतदारसंघात अत्यंत गोपनीय पध्दतीने विविध पातळ्यांवर हा सर्व्हे करण्यात आला. भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे हे उत्तर प्रदेश प्रभारी आहेत.
सर्व्हेनुसार, राज्यातील भाजपच्या १२५ ते १२८ आमदारांविरोधात जनमत आहे. त्यामुळे या आमदारांचे तिकीट कापले जाऊ शकते किंवा मतदारसंघांमध्ये बदल केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या यादीत विद्यमान मंत्री आणि मातब्बर नेत्यांचाही समावेश आहे. भाजपसमोर हॅटट्रिकचे आव्हान असून त्यासाठी पक्ष या आमदारांना घरी पाठविण्यास मागेपुढे पाहणार नाही, अशी चर्चा आहे.
लोकसभा निवडणुकीत पक्षाला मोठा फटका बसला होता. पक्षाच्या निम्म्याहून अधिक जागा कमी झाल्या होत्या. परिणामी, केंद्रात भाजप एकहाती सत्ता काबीज करता आली नाही. विधानसभा निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी भाजपने ताकद लावली आहे. राज्यात अधिकाधिक जागा जिंकून आगामी लोकसभा निवडणुकीआधीच पक्षाची स्थिती मजबूत करण्याकडे भाजपचा कल आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत भाजपने तब्बल २५५ जागा जिंकत एकहाती सत्ता मिळविली होती. एनडीएच्या आमदारांचा आकडा २७३ वर पोहोचला होता. राज्यात बहुमतासाठी २०२ ही मॅजिक फिगर आहे. यंदाची निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक असल्याची चर्चा आहे. पेपरफुटीचे आंदोलन, बेरोजगारी, जेन झी आंदोलन, राम मंदिरातील देणगी चोरी आदी मुद्दे या निवडणुकीत भाजपविरोधात जाणारे आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघावर पक्षाच्या नेत्यांची बारकाईने नजर असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.