New Delhi : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस यांच्यातील लढत रंगतदार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर हल्ले चढवले जात आहे. त्यातच ट्रम्प यांनी कमला हॅरिस यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने वातावरण चांगलंच तापलं आहे.
ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे तर हॅरिस या डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार आहेत. कमला हॅरिस भारतीय वंशाच्या असल्याने त्यांच्या उमेदवारीविषयी भारतातही मोठी उत्सुकता आहे. त्या निवडणूक जिंकल्यास भारतासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे. पण त्यावरूनच आता ट्रम्प यांनी जोरदार टीका करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
कमला हॅरिस या जाणीवपूर्वक आपण कृष्णवर्णीय असल्याची भाषा बोलू लागल्या आहेत, अशी टीका ट्रम्प यांनी केली आहे. शिकागो येथील नॅशनल असोसिएशन ऑफ ब्लॅक जर्नालिस्टच्या कार्यक्रमात त्यांनी हे विधान केले आहे. त्या नेहमी आपण भारताशी जोडले असल्याचे सांगत होत्या. पण अचानक कृष्णवर्णीय झाल्या आहेत. त्या कृष्णवर्णीय कधी झाल्या, असा सवाल ट्रम्प यांनी केला.
कमला हॅरिस भारतीय आहेत की कृष्णवर्णीय हे मला माहिती नाही. मी भारतीयांसह कृष्णवर्णीयांचाही सन्मान करतो. पण हॅरिस यांच्या मनात ही भावना आहे का? कारण त्या नेहमीच भारतीय होत्या आणि स्वत:ला भारताशी जोडले असल्याचे सांगत होत्या. पण अचानक कृष्णवर्णीय झाल्या आहेत, असे ट्रम्प म्हणाले.
ट्रम्प यांच्या विधानावर व्हाईट हाऊसकडून पलटवार करत हे अपमानजनक असल्याचे म्हटले आहे. यावर केवळ कमला हॅरिस हबोलू शकतात. कुणालाही हे सांगण्याचा अधिकार नाही की त्या कोण आहेत, त्यांना कसे ओळखले जावे. ट्रम्प यांचे विधान अपमानजनक आहे, असे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव कैरिन जीन-पियरे यांनी म्हटले आहे.
अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय, आशियाई मूळ असलेल्या लोकांचे मतदानही मोठ्या संख्येने आहे. कमला हॅरिस यांना उमेदवारी मिळाल्यापासून या लोकांचे समर्थन वाढत चालले आहे. नुकत्याच झालेल्या सर्व्हेमध्ये हॅरिस यांची लोकप्रियता वाढल्याचे समोर आले आहे. माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीही त्यांना पाठिंबा दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.