

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान लोकसभा व राज्यसभेत झालेल्या अभूतपूर्व गोंधळावरून केंद्र सरकार व विरोधक आमनेसामने आले आहेत. त्यात देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमना यांनीही संसदेतील कामकाजाबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. खेदजनक म्हणत त्यांनी सध्या संसदेत संमत होत असलेल्या कायद्यांमध्ये कोणतीच स्पष्टता नसल्याचे त्यांनी सुनावलं. (We see lot of ambiguity in making laws says Chief Justice N V Ramana)
पेगॅसस प्रकरण, कृषी कायदे आदी मुद्दांवरून विरोधकांनी दोन्ही सभागृह दणाणून सोडली होती. त्यामुळे कामकाजात सतत अडथळे आले. या गोधळाच्या स्थितीत 127 वी घटनादुरूस्ती वगळता सर्व विधेयकं चर्चेविना संमत करण्यात आली. यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं होतं. तर सरकारकडून विरोधकांकडे बोट दाखवण्यात आलं. नेमकं याच मुद्याच्या अनुषंगाने सरन्यायाधीश रमना यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात भाष्य केलं.
ते म्हणाले, आपण जर आपल्या स्वातंत्र्यसैनिकांकडे पाहिले तर त्यामध्ये अनेकांना कायद्याची जाण होती. आधी लोकसभा व राज्यसभेतील सदस्यांमध्ये अनेक जण वकील असायचे. त्यामुळं संसदेतील चर्चा रचनात्मक व्हायची. अनेक वित्तीय विधेयकांवरही मी चर्चा पाहिली आहे. खूपच रचनात्मक बिंदूंवर आधारीत चर्चा होत असे. पण आताची स्थिती खेदजनक आहे.
त्यावेळी कायद्यांवर चर्चा करण्यात आली. विचारांची आदानप्रदान झाली. खूप चर्चा झाल्यानं त्यावेळी प्रत्येकासमोर कायद्याचे स्पष्ट चित्र असायचे. आता आपण सभागृहात काय पाहत आहोत, हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आता योग्यप्रकारे चर्चा होत नाही. कायद्यांमध्ये कोणतीही स्पष्टता नसते. कायद्याचा उद्देश काय, हे आम्हाला माहित नसतं. हे जनतेचं मोठं नुकसान आहे. सभागृहांमध्ये वकील, बुध्दिजीवी लोक नसल्यानं हे होतं आहे, असं सरन्यायाधीश म्हणाले.
दरम्यान, चर्चेविना कायदे संमत करण्यात आल्याने तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनी आपण कायदे बनवतोय की 'पापडी चाट', अशां शब्दांत सरकारवर टीका केली होती. त्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ओब्रायन यांना खडेबोल सुनावले होते. त्याचप्रमाणे इतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही सरकारच्या या धोरणावर टीका केली आहे. राज्यसभेत अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी एका विमाविषयक विधेयकावरून मोठा गदारोळ झाला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.