West Bengal News : काँग्रेस दररोज धक्के बसत असून आता एकही आमदार नसलेल्या पश्चिम बंगालमधूनही नेत्यांची नाराजी समोर आली आहे. तृणमूल काँग्रेसशी आघाडी करण्यासाठी काँग्रेस (Congress) आग्रही असल्याने प्रदेश काँग्रेसचे सदस्य कौस्तव बागची यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. बागची यांनी मागीलवर्षी ममता सरकारच्या विरोधात मुंडन करत शपथ घेतली होती. सरकार पडेपर्यंत केस वाढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते.
कौस्तव बागची (Koustav Bagchi) हे वकील असून वयाच्या चौदाव्या वर्षापासून काँग्रेसमध्ये सक्रीय होते. युवक काँग्रेससह प्रदेश काँग्रेसमध्येही विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. मागीलवर्षी त्यांना पोलिसांनी अटक केली होती. जामीनावर तुरूंगात बाहेर येताच त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या सरकारविरोधात शड्डू ठोकला होता.
जोपर्यंत ममता बॅनर्जी यांचे सरकार पाडत नाही, तोपर्यंत केस वाढवणार नाही, असे बागची यांनी जाहीर केले. त्यानंतर लगेच मुंडनही केले होते. त्यानंतर आजही ते तसेच वावरत आहेत. आज त्यांनी काँग्रेस पक्षाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त करत प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
बागची यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे (Mallikarjun Kharge) यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, काँग्रेसमधील काही नेत्यांच्या फायद्यासाठी तृणमूल काँग्रेससोबत (TMC) आघाडी करण्याचा पयत्न हा पक्षाच्या एकनिष्ठ सैनिकांचा अपमान आहे. पक्षाची राजकीय नैतिकता संपुष्टात आली आहे. त्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचे बागची यांनी स्पष्ट केले आहे.
आसाममध्येही काँग्रेसला धक्का
आसामचे मंत्री पिजूष झकेरिया यांनी कालच काँग्रेसमधील अनेक आमदार व नेते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष राणा गोस्वामी यांनी आज पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही काँग्रेसमधील केवळ मुस्लिम आमदार वगळता सर्वजण 2026 मधील निवडणुकीआधी बाहेर पडतील, असे म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.