CM News : लोकसभा निवडणूक तोंडावर आली आहे. सर्वच पक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध योजनांची घोषणा, उद्घाटनाचे कार्यक्रम जोरात सुरु आहेत. सध्यातरी भाजपने यात आघाडी घेतल्याचे चित्र आहे. दरम्यान, भारतातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांवर केलेल्या सर्वेक्षणाचे निकाल खूपच आश्चर्यकारक आहेत.
या सर्वेक्षणानुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर तर तिसऱ्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत. विशेष म्हणजे या यादीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीही नाहीत. पहिल्या क्रमांकावर असलेले नाव अनपेक्षित आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कामाचे मूल्यांकन करण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण झाले. त्यानुसार, त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांनी मुख्यमंत्र्यांमधील लोकप्रियतेच्या बाबतीत पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे. देशातील मुख्यमंत्र्यांची लोकप्रियता आणि स्वीकारार्हतेचे मूल्यांकन करणे हा या सर्वेक्षणाचा उद्देश होता. ज्यातून काही वेगळे निकाल समोर आले आहेत.
या सर्वेक्षणानुसार, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक 52.7 टक्के लोकप्रियता रेटिंगसह पहिल्या क्रमांकावर आहेत. ते सलग पाच वेळा ओडिशाचे मुख्यमंत्री राहिले आहेत. बीजेडीचे नवीन पटनायक हे चामलिंग आणि ज्योती बसू यांच्यानंतर सलग पाच वेळा मुख्यमंत्री होणारे तिसरे नेते आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 51.3 टक्के लोकप्रियता रेटिंगसह दुसरे स्थान पटकावले आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ही दुसरी टर्म आहे. तिसऱ्या क्रमांकावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आहेत, त्यांना 48.6 टक्के रेटिंग मिळाले आहे, तर चौथ्या स्थानावर गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आहेत, त्यांना 42.6 टक्के रेटिंग मिळाले आहे.
त्याचवेळी डॉ. माणिक साहा 41.4 टक्के लोकप्रियता रेटिंगसह पाचव्या स्थानावर आहेत. त्रिपुरातील लोकांमध्ये ते खूप लोकप्रिय आहेत. लोक त्याच्या साधेपणा, समर्पण आणि प्रामाणिकपणाचे कौतुक करतात. विशेष म्हणजे,मार्च 2023 मध्ये, भाजपला विजय मिळवून देणारे माणिक साहा हे व्यवसायाने डेंटिस्ट आहेत. भाजपला त्यांनी त्रिपुरामध्ये सत्तेवर आणले. त्यांनी सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मुळचे काँग्रेसचे असलेले साहा 2016 मध्ये भाजपमध्ये दाखल झाले होते. 2020 मध्ये त्यांना भाजपची राज्याची धुरा देण्यात आली.
दरम्यान, आश्चर्याची गोष्ट म्हणजे योगी आदित्यनाथ आणि त्यांच्यानंतर येणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या रँकिंगमध्ये मोठी तफावत आहे. भारतभर केलेल्या सर्वेक्षणात केवळ 19.6 टक्के लोक अरविंद केजरीवाल यांना सर्वोत्तम मुख्यमंत्री मानतात.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.