CJP Protest News : अमित शहा, राजनाथ सिंह मागेच राहिले, भाजपने CJP आंदोलन थोपवण्यासाठी जेपी नड्डांनाच का पुढे केलं?

JP Nadda's Role in Managing the CJP Protest : केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. ते सध्या आरोग्यमंत्री आहेत. CJP आंदोलन थोपवण्यासाठी ते पुढे आले असून भाजपचे संकटमोचक म्हणून पुढे येत आहेत.
JP Nadda, CJP Protest,
JP Nadda, CJP Protest,Sarkarnama
Published on
Updated on

Sonam Wangchuk Protest : नीट पेपर फुटीचा वाद आणि कॉक्रोच जनता पार्टी ( CJP) च्या आंदोलनामुळे केंद्र सरकार सध्या अडचणीत सापडले आहे. त्यानंतर आता विरोधकांनीही पेपर लीकचा मुद्दा जोरदार उचलून धरला असून देशभरात रस्त्यापासून संसदेपर्यंत आंदोलने सुरु आहेत. भाजप आणि केंद्र सरकारसाठी ही अत्यंत संवेदनशील परिस्थिती मानली जात आहे. अशावेळी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा सरकारसाठी मोठे संकटमोचक म्हणून पुढे आल्याचे चित्र दिसत आहे.

CJP च्या आंदोलनकर्त्यांशी चर्चा असो, जंतर-मंतरवरील आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची भेट असो किंवा मेदांता रुग्णालयात सोनम वांगचुक यांच्याशी दोन फेऱ्यांमध्ये झालेली चर्चा असो, प्रत्येक टप्प्यावर जे. पी. नड्डा यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. इतकेच नव्हे, तर जे. पी. नड्डा यांच्या शिष्टाईनंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जवळपास 26 दिवसांनंतर आपले उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला.

वागचुंक यांना आश्वस्त करण्यासाठीही नड्डा यांनीच पुढाकार घेतला. जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी रुग्णालयात सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरकारने कोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत याची माहिती दिली. जेपी नड्डा यांनी सोनम वांगचुक यांना सरकारचे संपूर्ण आश्वासन वाचून दाखवले. सोनम वांगचुक यांचे उपोषण संपवण्यात त्यांना पहिले यश मिळाले असून आता CJP चे आंदोलन संपुष्टात आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे.

नड्डा सरकारचे संकटमोचक कसे ठरले?

केंद्रीय मंत्री जेपी नड्डा हे भाजपचे वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्षपद या वर्षाच्या सुरूवातीलाच सोडले होते. त्यानंतर त्यांच्यावर केंद्रीय आरोग्य मंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष पद सोडल्यानंतर जेपी नड्डा काहीसे बॅकफूटवर गेले होते. परंतु देशात सुरु असलेलं अत्यंत मोठे आंदोलन थोपवण्याची जबाबदारी भाजपकडून जे. पी नड्डा यांच्यावर सोपवण्यात आल्याचं दिसत असून ते त्यादृष्टीने अॅक्शन मोडवर आले.

भाजपच्या वरिष्ठ रणनीतिकारांनी जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वाखाली संवाद आणि तोडगा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. त्यामुळे नड्डा सरकारचे संकटमोचक ठरत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या बहुतांश बैठका आणि चर्चांमध्ये नड्डा हेच आघाडीवर दिसून आले.

आंदोलनकर्त्यांशी पहिली बैठक

२० जुलै रोजी जे. पी. नड्डा यांनी CJP च्या प्रतिनिधींशी भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या योग्य स्तरावर मांडल्या जातील, असे आश्वासन दिले. विशेष म्हणजे, हाच तो दिवस होता, जेव्हा आंदोलनाने प्रथमच उग्र स्वरूप धारण केले होते. CJP ने संसद मोर्चाची घोषणा केली होती. मात्र, त्याचवेळी सरकारकडून पडद्यामागील संवादही सुरू होता.

जखमी आंदोलनकर्त्यांची घेतली भेट

२० जुलै रोजी आंदोलनादरम्यान हिंसाचार झाला. जंतर-मंतर येथे पोलिसांसह अनेक आंदोलनकर्ते जखमी झाले. त्यानंतरच्या दिवशी जे. पी. नड्डा यांनी जखमी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांना सर्वतोपरी वैद्यकीय मदतीचे आश्वासन दिले. तसेच त्यांच्या मागण्यांवर चर्चेसाठी सरकार तयार असल्याचे सांगितले.

मंगळवार संध्याकाळपर्यंत सरकारने CJP आणि आंदोलनकर्त्यांना कधीही सरकारशी चर्चा करण्यासाठी भेटू शकता, असा संदेश दिला. संसदेतही नड्डा यांनी सरकार चर्चेसाठी तयार असल्याचे स्पष्ट केले.

मध्यरात्री मेदांता रुग्णालयात पोहोचले नड्डा

यानंतर जे. पी. नड्डा यांनी गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात जाऊन सोनम वांगचुक यांची भेट घेतली. या भेटीनंतर सरकारचा एकीकडे आंदोलनकर्त्यांशी तर दुसरीकडे सोनम वांगचुक यांच्याशी थेट संवाद प्रस्थापित झाला. काही वेळानंतर सोनम वांगचुक यांनी सरकारला उद्देशून पत्र प्रसिद्ध केले, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मागण्या मांडल्या.

गेल्या दोन दिवसांत सरकारने त्या मागण्यांचा सविस्तर अभ्यास करून त्यांची पूर्तता करण्यासाठी एक आराखडा तयार केल्याचे सांगितले जाते.

नड्डांची शिष्टाई, मोदींचा व्हीडीओ अन् वांगचुक यांचे उपोषण समाप्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास एक व्हिडीओ शेअर केला. पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आणि मंत्रिमंडळात मोठा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सोनम वांगचुक यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय जाहीर केला.

जबाबदारी नड्डांवरच का? अमित शहा, राजनाथ सिंह यांच्यावर का नाही?

नड्डा यांची ओळख संयमी, मृदूभाषी आणि प्रभावी संवाद साधणारे नेते अशी आहे. ते सध्या केंद्रीय आरोग्यमंत्री असल्यामुळे त्यांना या प्रकरणात पुढे करण्याचा निर्णय हा राजकीयदृष्ट्या योग्य असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेणे ही आरोग्यमंत्री म्हणून त्यांची नैसर्गिक जबाबदारी आहे.

जेपी नड्डा यांना विद्यार्थी राजकारणातील मोठा अनुभव आहे. संवाद साधणे, मतभेद मिटवणे आणि वाटाघाटींमधून मार्ग काढणे ही त्यांची जमेची बाजू आहे. तर, गृहमंत्री अमित शाह किंवा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना चर्चेसाठी पाठवले असते, तर सरकार दबावाखाली आले आहे, अशी धारणा निर्माण झाली असती. शिवाय, आंदोलनकर्त्यांना सरकार अपेक्षेपेक्षा अधिक महत्त्व देत आहे, असाही संदेश गेला असता. त्यामुळे एक संतुलित संदेश देण्यासाठी मोदी सरकारने नड्डांवर जबाबदारी दिली असावी असे राजकीय जाणकारांचे मत आहे.

आतापर्यंतच्या घडामोडींमध्ये जे. पी. नड्डा यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जात आहे. मात्र, त्यांचे काम अद्याप अर्धवट असल्याचे मानले जाते. कारण आंदोलन पूर्णपणे संपल्यानंतरच ही प्रक्रिया यशस्वी ठरल्याचे मानले जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com