
निवास चौगले
SamarjeetSinh Ghatge News : कागलच्या ‘शाहू ग्रुप’चे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते समरजितसिंह घाटगे (Samarjeetsinh Ghatge) यांचे वजन कधी काळी शंभर किलो होते असे सांगितले तर अनेकांचा त्यावर विश्वास बसणार नाही. पण रोज 55 मिनिटे व्यायाम, त्यातील 20 मिनिटे जॉगिंग आणि जेवताना पाळले जाणारे कडक पथ्य यामुळे त्यांनी वजन कमी करून ते नियंत्रित ठेवण्याबरोबरच स्वतःला ‘फिट’ ठेवले आहे.
राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांचा फिटनेस हा नेहमीच चर्चेचा आणि कुतूहलाचा विषय असतो. त्यात राजकारण, सहकार आणि समाजकारणात काम करणारे लोक आपली प्रकृती कशी जपतात याची उत्सुकता असते. घाटगे कुटुंबाने कायम शाहू महाराजांच्या सामाजिक कार्याचा वारसा जपला आहे. यामुळे बालपणापासूनच त्यांच्यावर समाजकारणाचे संस्कार झाले.
समरजितसिंह यांच्याकडे राजघराण्याचा वारसा, त्यामुळे ते राजेशाही थाटात जगू शकले असते, पण आपली प्रकृती चांगली तरच आपण निवडलेल्या कार्यात यशस्वी काम करू शकतो हे ओळखून त्यांनी तब्येत सांभाळण्यासाठी जो व्यायाम असेल किंवा आहारावर ठेवलेले नियंत्रण हाच त्यांचा ‘फिटनेस फंडा’ दिवसभर त्यांना काम करण्यासाठी ऊर्जा देतो.
कोल्हापूर (Kolhapur) असो किंवा कागल, मुंबईत आठवड्यातील पाच दिवस जॉगिंग, स्ट्रेचिंग आणि अन्य व्यायाम हा ठरलेला असतो. बाहेर गावी जाताना बॅग भरताना पहिल्यांदा व्यायामाचे कपडेच त्यात घातले जातात. देशाच्या कुठल्याही भागात असलो तरी आठवड्यातील पाच दिवस व्यायाम ठरलेला आहे. याशिवाय आहारावरही त्यांनी प्रचंड नियंत्रण ठेवले आहे. व्यायाम असा करायची की तो कुठेही गेला तरी करता आला पाहिजे. त्यामुळे परगावी असले तरी व्यायामात खंड पडत नाही.
शाहू ग्रुपचे संस्थापक विक्रमसिंह घाटगे यांच्या अकाली निधनानंतर या ग्रुपची संपूर्ण जबाबदारी एकट्या समरजितसिंह घाटगे यांच्यावर येऊन ठेपली. शाहू ग्रुप मध्ये साखर कारखाना शिक्षण संस्था नागरी पतसंस्था, बँक , दूध संघ असा मोठा व्याप आहे. विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर या सर्व संस्थांच्या कारभार समरजित यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला, त्याचवेळी त्यांनी आपली राजकीय इच्छाशक्ती ही लपवून ठेवली नाही.
वडिलांप्रमाणे आपणही विधानसभेत जावे अशी त्यांची इच्छा होती त्यातून ते पर्याय नसल्याने भारतीय जनता पक्षाशी जोडले गेले, पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले, पण 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप व सेनेची युती झाली, त्यामुळे या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. त्यात त्यांचा पराभव झाला असला तरी 88 हजार मते त्यांनी घेतली.
2024 च्या निवडणुकीत तेच भाजप उमेदवारीचे प्रबळ दावेदार असताना अचानक राजकीय उलथापालथ झाली आणि पुन्हा त्यांना थांबावेच लागेल अशी स्थिती होती. पण त्यांनी योग्यवेळी योग्य निर्णय घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि या पक्षाची विधानसभा निवडणुकीतील उमेदवारी मिळवली. या निवडणुकीतही त्यांचा पराभव झाला, पण पराभवाने खचून न जाता ते पुन्हा लोकांच्या संपर्कात मैदानात उतरलेले आहेत.
व्यायामाबरोबरच चांगला, पोषक आणि वेळेवर आहार घेणे हेही घाटगे यांच्या चांगल्या तब्येतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रचार असो किंवा अन्य कामानिमित्त एखाद्या गावात गेलो, कार्यकर्त्यांची घरी गेलो तर चहा बिलकूल प्यायचा नाही हा त्यांचा आणखी एक नियम. चहाऐवजी लिंबू पाणी, ताक यावर भर दिला जातो.
चिकन हा आवडता पदार्थ पण आठवड्यातून फक्त एक दिवसच आणि तेही मर्यादित स्वरूपात चिकन खाणे होते. अन्य दिवशी शाकाहारीच पण ‘डाएट प्लॅन’नुसारच जेवण असो किंवा नाष्टा ठरलेला आहे. त्यामुळे एकेकाळी शंभर किलो असलेले समरजितसिंह घाटगे यांना वजन घटवण्याबरोबरच अन्य आजारांना व्यायामाच्या माध्यमातून दूर ठेवले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.