Kolhapur News : सुरुवातीपासूनच आघाडी घेतलेल्या भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार पी. एन. पाटील गटाने सत्ता काबीज केली. मात्र, पी. एन. पाटील गटाच्या मुख्य शिलेदाराला पराभवाला सामोरे जावे लागले.
सत्ताधाऱ्यांनी आपली सत्ता काबीज केली असली तरी त्यांच्या विजयाचे श्रेय विरोधी आघाडीचे धैर्यशील पाटील यांनाच द्यावे लागेल. कारण मत विभाजनाचा फटका ही सत्ताधाऱ्यांची जमेची बाजू ठरली. (Latest Marathi News)
रात्री उशिरा झालेल्या मतमोजणीत त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीने २५ पैकी २४ जागा सुमारे अडीच हजारांच्या फरकाने जिंकल्या. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याच्या मुद्द्यावरून ही निवडणूक गाजली होती. आता सत्तेवर आलेल्या संचालक मंडळाला कारखाना कर्जमुक्त करावा लागेल व सभासदांची सवलतीची साखर देण्यासाठी कटिबद्ध व्हावे लागेल, याचे मोठे आव्हान नव्या संचालक मंडळासमोर असणार आहे.
विरोधी आघाडीचे नेते धैर्यशील पाटील आणि विद्यमान उपाध्यक्ष व त्यांचे चुलते उदयसिंह पाटील-कौलवकर यांच्यामध्ये अखेरच्या क्षणापर्यंत मोठी चुरस झाली. उदयसिंह पाटील कौलवकर हे पी. एन. पाटील यांचे निष्ठावंत मानले जातात.
त्यांच्या विजयासाठी आमदारांनी तंबी दिल्याचेही वृत्त आहे. मात्र, त्यांचा विजय खेचून आणण्यासाठी ते अपयशी ठरले. अंतर्गत काँग्रेसमध्येच उदयसिंह पाटील यांच्याबाबत नाराज होती. तीच नाराजी सभासदांनी मतदानातून दाखवून दिली. तेव्हा धैर्यशील पाटील विजयी झाले होते. यामुळे पी. एन. पाटील यांच्या गटाची ‘गड आला; पण सिंह हरला’ अशी स्थिती झाली.
भोगावती कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आमदार पी. एन. पाटील यांना शेकापचे माजी आमदार संपतबापू पवार-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, ‘गोकुळ’चे अध्यक्ष अरुण डोंगळे व जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील यांनी साथ दिली होती.
त्यांच्या राजर्षी शाहू शेतकरी सेवा आघाडीला माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या संस्थापक दादासाहेब पाटील-कौलवकर आघाडीने तसेच माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले, भाजपचे हंबीरराव पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जालंदर पाटील यांच्या परिवर्तन आघाडीने आव्हान दिले होते. अत्यंत चुरशीने झालेल्या मतदानामध्ये वाढलेला टक्का अखेर पी. एन. पाटील यांच्या बाजूचा कौल देणारा ठरला.
या निकालात फक्त विद्यमान उपाध्यक्ष उदयसिंह पाटील यांचा पराभव झाला. संस्था गटाच्या शेवटच्या मतमोजणीमध्ये ‘पॅनेल टू पॅनेल’ मतदान झाले असताना फक्त पाटील यांना वगळल्याचे दिसून आले. याचीच चर्चा मतमोजणी केंद्रावर होती.
कौलव गट -
राजाराम शंकर कवडे, धीरज विजयसिंह डोंगळे, धैर्यशील आनंदराव पाटील.
राशिवडे गट -
मानसिंग विष्णूपंत पाटील, अविनाश तुकाराम पाटील, कृष्णराव शंकरराव पाटील, प्रा. आनंदा धोंडीराम चौगुले
कसबा तारळे गट -
अभिजित आनंदराव पाटील, रवींद्र दत्तात्रय पाटील, दत्तात्रय हणमा पाटील.
करवीर तालुका - कुरुकली गट -
शिवाजी पांडुरंग कारंडे, धोंडीराम ईश्वरा पाटील, केरबा भाऊ पाटील, पांडुरंग शंकर पाटील
सडोली खालसा गट -
रघुनाथ विठ्ठल जाधव, अक्षय अशोकराव पवार-पाटील, भीमराव अमृता पाटील, प्रा. शिवाजी आनंदराव पाटील
हसूर दुमाला गट :
प्रा. सुनील आनंदराव खराडे व सरदार चिल्लापा पाटील
महिला राखीव -
सीमा मारुती जाधव व रंजना दिनकर पाटील
अनुसूचित जाती -
दौलू कांबळे.
इतर मागासवर्ग -
हिंदुराव चौगले
भटक्या विमुक्त जाती -
तानाजी काटकर
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.