
माजी आमदार सुजित मिणचेकर यांचा शिवसेना प्रवेश ताजा असतानाच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिरोळचे माजी आमदार उल्हास पाटील हेही आता भाजपच्या वाटेवर आहेत. नुकतीच त्यांची आणि खासदार धनंजय महाडिक यांची भेट झाली असून यात प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते.
उल्हास पाटील हे मुळचे स्वाभिमानी शेतकरी संघटनचेचे कार्यकर्ते आहेत. राजू शेट्टी (Raju Shetty) यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी संघटनेत काम केले, आंदोलने केली, केसेसे अंगावर घेतल्या. चळवळ वाढवली. पण 2014 साली शेट्टी यांच्याशी मतभेद झाले आणि त्यांनी त्यावेळच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी त्यांना विधानसभेचेही तिकीट मिळाले आणि विजयही मिळाला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र भाजप-सेना युती असतानाही शिरोळमध्ये पाटील यांचा पराभव झाला. त्यानंतरही ते शिवसेनेत काम करत राहिले. अगदी शिवसेनेत फूट पडल्यानंतरही त्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. विविध आंदोलने करत आणि कामाच्या जोरावर मतदारसंघात सक्रिय राहिले.
पण 2024 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये शिरोळची जागा काँग्रेसला (Congress) सुटली. त्यामुळे उल्हास पाटील नाराज झाले आणि त्यांनी पुन्हा राजू शेट्टी यांच्याशी जुळवून घेतले. त्यांनी निवडणुकीपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेत प्रवेश केला. पण त्या निवडणुकीत त्यांचा दारूण पराभव झाला. त्यांना अवघी 25 हजार मते मिळाली. आता पुढील राजकीय वाटचालीसाठी ते पर्यायांचा विचार करत आहेत.
राजू शेट्टी यांच्यासोबतच'स्वाभिमानी'शेतकरी संघटनेत राहावे तर राजकीय भविष्य अनिश्चित आहे. शिवसेनेमध्ये जावे तर विद्यमान शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले. उद्धव ठाकरे यांच्याकडे परतावे तर तिथेही भविष्य अनिश्चितच आहे. शिवाय पुन्हा जागा मित्र पक्षाला सुटली तर काय? याचे उत्तर ना ठाकरेंकडे आहे ना पाटील यांच्याकडे आहे.
भाजपचे शिरोळ तालुक्यातील संघटन चांगले असले, तरी त्याला चेहरा आणि नेतृत्त्वाचा अभाव आहे. पाटील यांच्या रूपाने ती कमतरता भरून निघू शकते. शिवाय पाटील यांच्या पक्ष प्रवेशाकडे भाजप 2029 च्या विधानसभा निवडणुकीची तयारी म्हणूनही पाहत असल्याचे सांगितले जाते. आगामी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी भाजपकडून सुरू आहे. त्यादृष्टीने शिरोळमध्ये उल्हास पाटील यांच्या भाजप प्रवेशाकडे बघितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.