
शक्तीपीठ महामार्गाला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीकडून विरोध होत असताना भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिवाजीराव पाटील यांनी या महामार्गाच्या समर्थनार्थ आज पदयात्रा काढली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या या महामार्गाच्या विरोधातील मोर्चात भाजपचे सहयोगी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी हजेरी लावत पक्षाची बंधने जुगारून आम्ही या मोर्चात सहभागी झालो असल्याचे स्पष्ट केले होते. एकंदरीत जिल्ह्यातील महायुतीतील मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना न दुखावण्याची भूमिका घेतली असताना दुसरीकडे मात्र उघडपणे चंदगडमध्ये भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका यावरूनच भाजपमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर आले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कुपेकर यांनी उमेदवारी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कुपेकर यांचा पक्ष प्रवेश झाला. तर अपक्ष म्हणून शिवाजीराव पाटील यांनी निवडणुकीचा शड्डू ठोकला. राष्ट्रवादीतून माजी आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी मिळाली. मात्र, तरी देखील कुपेकर यांनी बंडखोरीची भाषा केली. जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाचा विरोध पाहता आमदार शिवाजीराव पाटील यांनी या महामार्गाच्या समर्थनात राज्य सरकारलाच आपल्या मतदारसंघातून हा महामार्ग घेण्याची विनंती केली. त्यासाठी त्यांनी चार मार्गाचा पर्याय दिला.
वास्तविक चंदगड हा दुर्गम मतदारसंघ असून इथं दळणवळणाचा पुरेशी व्यवस्था नाही. या परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग आपल्या मतदारसंघातून गेल्यास मतदारसंघाचा थोडा का असेना विकास होईल ही भूमिका आमदार पाटील यांची आहे. मात्र दुसऱ्याच आठवड्यात इंडिया आघाडीकडून गडहिंग्लज येथे या शक्तीपीठ महामार्गाविरोधात आंदोलन झाले. त्याला मात्र भाजपचे पदाधिकारी संग्राम कुपेकर यांनी उपस्थिती लावली.
जोपर्यंत शक्तिपीठ महामार्ग रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा सुरू राहणार. या महामार्गात बरंच काही उध्वस्त होणार आहे. याचा विचार आपण आणि सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे. चंदगड आमची भूमी आहे. भूमीसाठी पक्षाची लेबल बाजूला ठेवून आणि पक्षाची बंधने जुगारून हा लढा उभा केलेला आहे. हा महामार्ग रद्द झाल्याशिवाय मी गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया भाजपचे विशेष कार्यकारी सदस्य संग्रामसिंह कुपेकर यांनी दिले आहे.
चार दिवसांपूर्वी झालेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील गडहिंग्लज येथील आंदोलनात महायुतीतील नेते माजी आमदार राजेश पाटील, भाजपचे कार्यकारी सदस्य संग्राम सिंह कुपेकर देखील या मनात सहभागी झाले होते. इकडे भाजपचे सहयोगी सदस्य आमदार शिवाजीराव पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ गडहिंग्लज येथे पदयात्रा काढली. यावेळी मात्र त्यांनी भाजपमधीलच संग्रामसिंह कुपेकर यांचा चांगलाच समाचार घेतला.
भाजपचे नेते स्वाभिमानी आहेत, पक्षात सध्या येणाऱ्यांचं पर्यटन सुरू आहे. जिल्ह्यात कोणताही नेता येऊ दे त्याला वाड्यावर बोलवा. डबल ढोलकी नेते भाजप कधी पाळत नाहीत. त्यांच्याबद्दल बोलणे योग्य नाही त्यांचं नाव देखील घेणे योग्य नसल्याची प्रतिक्रिया आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.