

कुडित्रे: ‘चंद्रदीप नरके यांनी महायुती सरकारच्या सर्व कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या. एक कार्यशील लोकप्रतिनिधीच हे करू शकतो. म्हणून गगनबावडा तालुक्यातील मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता जागरुकपणे मतदान करून चंद्रदीप नरकेंना विजयी करावे’, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष पी. जी. शिंदे यांनी केले.
महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार चंद्रदीप नरके यांच्या प्रचारार्थ गगनबावडा तालुक्यातील खडुळे, मुटकेश्वर, लोंघे, किरवे, म्हाळुंगे, साखरी, तिसंगी, टेकवाडी, मुसलमानवाडी, फकीरवाडी, निवडे, वेसर्डे, तामकरवाडी, असंडोली, देसाईवाडी, रावणवाडी, शिंदेवाडी, तळये बु., कोदे खुर्द, ठाकूरवाडी, आंबेवाडी, कोदे बु. या गावांच्या प्रचार संपर्क दौऱ्यात ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, ‘मागील पाच वर्षांत काँग्रेसच्या आमदारांनी सर्वसामान्य माणसांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केले; पण पदावर नसताना चंद्रदीप नरके यांनी विकासकामांसाठी शंभर कोटींचा निधी करवीर मतदारसंघासाठी आणून आपले कार्यकौशल्य सिद्ध केले आहे. गगनबावडा तालुका हा करवीर विधानसभा मतदारसंघातील दुर्गम - डोंगराळ परिसर आहे. या परिसरातील लोकांशी नेहमी संपर्कात राहून त्यांच्या समस्या सोडविल्या.’
‘गोकुळ’चे संचालक अजित नरके म्हणाले, ‘संकटाच्या काळात मदतीला धावून जाणारे चंद्रदीप नरके यांचे करवीरच्या जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले आहे. चंद्रदीप यांना गगनबावड्याच्या समस्यांची जाण आहे.
आपल्या कार्याच्या जोरावर ते पुन्हा विधानसभेसाठी सज्ज झाले आहेत. मागील निवडणुकीत चुकीच्या उमेदवाराला मतदान झाल्याने मतदारसंघ विकासापासून दहा वर्षे मागे गेला आहे. आता वेळ आपली आहे. गगनबावडा तालुक्याच्या विकासासाठी गटतट विसरून चंद्रदीप नरके यांना बहुमताने विजयी करूया.’
माजी पं. स. सभापती लहू गुरव म्हणाले, ‘जनतेचा आमदार म्हणून चंद्रदीप नरके यांना निवडून आणण्यासाठी त्यांचे धनुष्यबाण हे चिन्ह घरोघरी पोहोचवून त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याची जबाबदारी आपली आहे.’
यावेळी गगनबावडा पं. स. माजी सभापती एकनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ. आनंद गुरव, गगनबावडा तालुका प्रमुख स्वप्नील शिंदे, शिवसेना तालुका प्रमुख तानाजी काटे, रघू पाटील, दादू पाटील, राजाराम पाटील, इंद्रजित मेंगाणे, प्रदीप पाटील, तानाजी पडवळ, बाजीराव गुरव, सचिन जाधव उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.