

8 व्या वेतन आयोगाबाबत केंद्र सरकारकडून अखेर मोठी आणि स्पष्ट माहिती समोर आली आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक अनेक दिवसांपासून ज्या निर्णयाची वाट पाहत होते, त्या संदर्भात सरकारने संसदेत महत्त्वाचा खुलासा केला आहे. राज्यसभेत सरकारने सांगितले की 8 व्या केंद्रीय वेतन आयोगाची स्थापना आधीच करण्यात आली असून आयोग आपले कामकाज पुढे नेत आहे.
राज्यसभेतील खासदार जावेद अली खान यांनी विचारलेल्या लिखित प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर 2025 रोजीच 8 व्या वेतन आयोगाच्या स्थापनेला आणि त्याच्या कार्यकक्षेला अधिकृत मंजुरी देत अधिसूचना प्रसिद्ध केली होती. त्यामुळे हा आयोग केवळ चर्चेपुरता मर्यादित नसून प्रत्यक्षात कार्यरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सरकारने पुढे सांगितले की, वेतन आयोगाची स्थापना झाल्यानंतर 18 महिन्यांच्या आत आयोग आपले शिफारस अहवाल सादर करणार आहे. याचा अर्थ केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढीसाठी अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. आयोगावर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध भत्ते आणि पेन्शन यासंबंधी सर्व बाबींचा सखोल अभ्यास करून शिफारसी सुचवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यानंतर लाखो कर्मचाऱ्यांच्या पगारात आणि पेन्शनमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पेन्शनबाबत विचारलेल्या दुसऱ्या प्रश्नावर सरकारने स्पष्ट भूमिका मांडली आहे. वित्त राज्यमंत्र्यांनी सांगितले की निवृत्तीची तारीख लक्षात घेऊन पेन्शनधारकांमध्ये कोणताही भेदभाव केला जाणार नाही. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस (पेन्शन) नियम 2021 आणि अन्य लागू नियमांनुसारच पेन्शन दिली जाते. तसेच फायनान्स ऑक्टोबर 2026 अंतर्गत विद्यमान पेन्शन नियमांना वैधता देण्यात आली असून सिव्हिल किंवा डिफेन्स पेन्शनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही सरकारने स्पष्ट केले.
यापूर्वी जानेवारी महिन्यात सरकारने 8 व्या वेतन आयोगासाठी कार्यालयीन व्यवस्था पूर्ण करण्यात आल्याची माहिती दिली होती. त्याचबरोबर आयोगासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी नवीन भरती प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या सर्व घडामोडींमुळे 8 वा वेतन आयोग हळूहळू पूर्ण क्षमतेने कार्यरत होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. येत्या काळात आयोगाच्या कामकाजासंदर्भात आणखी महत्त्वाचे अपडेट्स समोर येण्याची शक्यता असून, त्याकडे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.