

उद्याच्या पिढीला घडवणाऱ्या शिक्षकांची पात्रता ठरवणाऱ्या महा-टीईटी परीक्षेचा 2025 चा निकाल जाहीर झाला असून या निकालाने संपूर्ण शिक्षण क्षेत्राला मोठा धक्का दिला आहे. राज्यातील लाखो उमेदवारांनी अपेक्षेने दिलेल्या या परीक्षेत केवळ 11.28 टक्के उमेदवारच उत्तीर्ण झाले आहेत. तर तब्बल 3 लाख 96 हजारांहून अधिक उमेदवार नापास ठरल्याने “गुरुजीच नापास?” असा सवाल उपस्थित होत आहे.
राज्य परीक्षा परिषदेकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, एकूण 4 लाख 75 हजार 669 उमेदवारांनी महा-टीईटीसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी 4 लाख 46 हजार 730 उमेदवार प्रत्यक्ष परीक्षेला उपस्थित राहिले, तर सुमारे 28 हजार 939 उमेदवार गैरहजर राहिले. अंतिम निकालात फक्त 50 हजार 369 उमेदवार पात्र ठरले असून उर्वरित 3 लाख 96 हजार 325 उमेदवार अनुत्तीर्ण झाले आहेत.
पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्ही स्तरांवर नापासांचे प्रमाण चिंताजनक आहे. इयत्ता पहिली ते पाचवीसाठी असलेल्या पेपर 1 मध्ये 2 लाखांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. यामध्ये उपस्थित उमेदवारांपैकी केवळ सुमारे ११.४७ टक्केच यशस्वी झाले. पेपर २ म्हणजे इयत्ता सहावी ते आठवीसाठीच्या परीक्षेतही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. या पेपरचा निकाल ११.१३ टक्क्यांवरच मर्यादित राहिला.
माध्यमनिहाय आणि विषयनिहाय निकाल पाहिल्यासही मोठी तफावत दिसून येते. कन्नड माध्यमाचा निकाल तुलनेने चांगला असून तो १५ टक्क्यांच्या पुढे आहे. मराठी, हिंदी आणि तेलुगू माध्यमाचा निकाल सरासरीच्या आसपास आहे. मात्र उर्दू, इंग्रजी आणि विशेषतः गुजराती माध्यमाचा निकाल अत्यंत कमी टक्केवारीत आहे. गणित-विज्ञान आणि सामाजिक विज्ञान या विषयांमध्येही अपेक्षेपेक्षा कमी निकाल लागल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, शिक्षकांशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीटीईटी देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कर्तव्यातून सूट देण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. निवडणूक आणि सीटीईटी परीक्षा एकाच कालावधीत आल्याने शिक्षकांची अडचण लक्षात घेऊन त्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये समाधान व्यक्त केले जात असून सर्व शिक्षक संघटनांनी याचे स्वागत केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.