Maharashtra Politics : राजकारणात कोण कधी शिखरावर असेल आणि कोण जमिनीवर? याचा काही नेम नाही. 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीने 32 खासदार निवडून आणले. त्यात सर्वाधिक 13 काँग्रेस पक्षाचे होते. तत्कालीन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना या विजयाचे श्रेय मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत स्वतःच्या साकोली मतदारसंघात विजय मिळवताना पटोलेंच्या नाकीनऊ आले. प्रदेशाध्यक्ष पदही त्यांना गमवावे लागले.
तर दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हे आपल्या सिल्लोड-सोयगाव मतदार संघातून अगदी काठावर निवडून आले. शिवाय नव्या महायुतीच्या सरकारमध्ये त्यांचे मंत्रिपदही गेले. सध्या पक्षामध्ये दुरावस्था झालेले हे दोन्ही नेते एकमेकांशी जवळीक साधून असल्याचे चित्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहायला मिळाले. विधान भवनाच्या लॉबीमध्ये अब्दुल सत्तार यांच्या खांद्यावर हात ठेवत चर्चा करताना नाना पटोले, सत्ताधारी भाजपाचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि इतर आमदार हे चित्र पाहून नेमकं कोण कोणाला आधार देतोय? असा प्रश्न निश्चितच पडतो.
मुंबईत विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून औरंगजेब कबर आणि त्यावरून नागपुरात उसळलेली दंगल या विषयावर सभागृहात सत्ताधारी,विरोधक यांच्यात प्रचंड गदारोळ सुरू आहे. अनेकवेळा विधानसभा अध्यक्षांना गोंधळामुळे कामकाज रद्द करावे लागत आहे. अशाच वातावरणात विधानभवनाच्या लॉबीमध्ये काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष (Nana Patole) नाना पटोले, शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसमधील तीनही नेते एकत्रित आले होते. या तिघांमध्ये चर्चा आणि हास्यविनोदही रंगला.
दरम्यान या संपूर्ण चर्चेवेळी नाना पटोले हे अब्दुल सत्तार यांच्या खांद्यावर हात ठेवूनच बोलत होते. अचानक सत्तार आणि नाना पटोले यांच्यात जवळीक वाढल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यामुळे नाराज असलेले अब्दुल सत्तार काँग्रेसमध्ये जाणार, अशा वावड्या विधानसभा निवडणुकीच्या काळात उठवल्या गेल्या होत्या. परंतु धूर्त राजकारणासाठी ओळखले जाणारे अब्दुल सत्तार सत्ताधारी पक्ष सोडून विधानसभेचे विरोधी पक्षनेते पदही न मिळवू शकलेल्या काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा भाग बनणार नाहीत, असा विश्वास त्यांच्या समर्थकांनाही होता.
पुढे घडले ही तसेच, सत्तारांनी आपली नाराजी लपवत स्वत:ला मतदारसंघात गुंतवून घेतले. शिवसेनेचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोडले तर इतर कुणाच्याही संपर्कात सत्तार फारसे नाहीत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा विचार केला तर पालकमंत्री संजय शिरसाट व इतर आमदार व नेत्यांनी सत्तार यांना आणि सत्तारांनी त्यांना वाळीत टाकल्याचे चित्र आहे. तिकडे काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नाही. विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतर पटोले यांना प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार व्हावे लागले.
साकोली या आपल्या विधानसभा मतदारसंघात अवघ्या दोनशे मतांनी निवडून आल्यामुळे त्यांच्याकडे पाहण्याचा पक्षातील इतर सहकारी आमदार व केंद्रातील नेत्यांचा दृष्टिकोनही काहीसा बदलल्याचे जाणवते. त्यामुळे कधीकाळी काँग्रेसमध्ये एकत्र काम केलेल्या अब्दुल सत्तार आणि नाना पटोले या दोन्ही नेत्यांनी आपल्या पक्षाशी अंतर राखत विरोधकांच्या तंबूतच अधिक वेळ घालवण्याचे ठरवले की काय? असा प्रश्न आज लॉबीमध्ये पटोले, सत्तार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांना एकत्र पाहून निश्चितच पडतो.
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.