
Mumbai : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा दुखावलं आहे. शिंदे यांचे मित्र अशी ओळख असलेल्या अजय आशर यांना 'मित्र' संस्थेच्या उपाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी महायुतीमधील समन्वय राखत मित्रपक्ष असलेल्या तीन पक्षातील नेत्यांची नियुक्ती करीत समतोल राखला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, भाजपकडून राणाजगजितसिंह पाटील यांची नियुक्ती झाली आहे. तर आणि शिवसेनेकडून आमदार राजेश क्षीरसागर यांची यापूर्वीची नियुक्ती कायम ठेवली आहे. पण या नियुक्त्यांपेक्षा देखील आशर यांना या पदावरून हटवल्याची जास्त चर्चा सुरू आहे. त्यामुळेच नेमके हे आशर आहेत तरी कोण? त्यांच्याबद्दल राजकीय नेते काय आरोप करतात?
अशर उद्योग समूहाच्या वेबसाईटवर लिहिल्याप्रमाणे, अजय अशर हे ठाण्यातील सुप्रसिद्ध अशर ग्रुपचे अध्यक्ष आणि मॅनेंजिंग डायरेक्टर आहेत. मागील 21 वर्षांपासून त्यांचा हा समूह ठाण्यामध्ये पायाभूत सुविधा विकासाचे काम करत आहे. इतरही आठ कंपन्यांचे अजय अशर हे संचालक आहेत. याशिवाय ते वकील आणि राज्य पातळीवरील माजी क्रिकेट खेळाडूही आहेत.
दुसऱ्या बाजूला ठाण्यातील राजकीय पत्रकारांच्या मते, 22 वर्षांपूर्वी अजय आशर ठाण्यात छोटे बिल्डर होते. छोट्या इमारती बांधण्याचे काम ते करायचे. एकनाथ शिंदे ठाणे महापालिकेत सभागृह नेते झाल्यानंतर आशर आणि शिंदे यांची चांगली ओळख झाली. शिंदे आमदार झाल्यानंतर ही जवळीक घट्ट मैत्रीमध्ये बदलली.
आज एकनाथ शिंदे यांच्या जवळचे असलेलया आशर यांची ठाण्यातील बडे प्रस्थ म्हणून ओळख आहे. ते रियल इस्टेटमधील आशर या ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्या ग्रुपचे मुंबई-ठाण्यात अनेक मोठे प्रोजेक्ट आहेत. कोरोना काळात ठाणे महानगरपालिकेचे ग्लोबल हॉस्पिटल आणि पार्किंग प्लाझा या दोन्ही रुग्णालयांचा कारभार आशर यांच्या जीतो कंपनीकडे गेला. याच दरम्यान, ठाणे (Thane) महापालिकेच्या भूखंडावर जितो रुग्णालय ही उभे राहिले.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अजय आशर हे एकनाथ शिंदे यांचे कलेक्टर असल्याचा आरोप केला आहे. "अजय आशर हा एकनाथ शिंदे यांचे सर्व व्यवहार संभाळतो, त्यांच्या जमीनीचे व्यवहार करतो. ज्यावेळी शिवसेना फोडण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी आमदारांना खरेदी करण्यासाठी पैशांचे व्यवहार अजय आशर यांनीच केले होते.
त्याचवेळी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी नोव्हेंबर 2020 मध्ये एक पत्रकार परिषद घेऊन अजय आशर हे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बिझनेस पार्टनर असल्याचे म्हंटले होते. सोबतच त्यांनी तत्कालीन मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावरही ऑफिस ऑफ प्रॉफिटचा भंग केल्याचा आरोप केला होता. आदित्य ठाकरे हे मंत्रिपदावर असताना देखील काही कंपन्यांमध्ये अजय आशर यांच्यासोबत भागीदार होते, असा सोमय्या यांचा आरोप होता.
याच पत्रकार परिषदेत सोमय्यांनी 15 जुलै 2019 चे आदित्य ठाकरे यांचे आशर प्रोजेक्टमधील भागीदार म्हणून राजीनामा देत असल्याचे पत्र समोर आणले होते. पण त्याचवेळी आदित्य ठाकरे हे मंत्री असतानाही मार्च 2020 पर्यंत भागीदार असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. अजय आशर हे ज्या कंपनीचे संचालक आहेत त्याच कंपनीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर हे देखील भागीदार असल्याचा आरोप होता.
2022 मध्ये आशर यांची मित्राच्या उपाध्यक्षपदी नेमणूक केल्यानंतरही बराच वागंद झाला होता. आशर यांची नियुक्ती करण्यास भाजपचा विरोध होता अशी चर्चाही रंगली होती. कारण राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपाचे नेते आमदार आशिष शेलार यांनी नगर विकास विभागाचे निर्णय घेणारा अजय आशर नावाचा व्यक्ती कोण? असा सवाल विचारला होता. देवेंद्र फडणवीस त्यावेळी विरोधी पक्षनेते होते व त्यांचाही असाच आक्षेप होता.
मात्र तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आशर यांची नियुक्ती प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे भाजपच्या नेत्यांची चांगलीच कोंडी झाली होती. एका लुटारू व्यक्तीची नियुक्ती शिंदे-फडणवीस सरकार निती आयोगासारख्या महत्वपूर्ण संस्थेत कॅबिनेट दर्जाच्या उपाध्यक्षपदी कशी करू शकतात? देवेंद्र फडणवीस यांची अजय आशर यांच्या नियुक्तीला सहमती आहे का? असे सवाल काँग्रेसने विचारले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.