Mumbai News: राज्यातील महापालिका निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या प्रचारादरम्यान, आरोप-प्रत्यारोप,हेवेदावे,पक्षांतर,फोडाफोडी यांनी राजकारण प्रचंड ढवळून निघालं आहे. यात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद टोकाला पोहोचला आहे.
यात पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर एकापाठोपाठ एक आरोपांचे जोरदार शाब्दिक हल्ले चढवले जात आहेत.त्याला भाजप आमदार महेश लांडगेंनी (Mahesh Landge) जशास तसं जोरदार प्रत्युत्तर देतानाच अजितदादांना महाराष्ट्राचा आका म्हणून संबोधले होते.याच टीकेवर अजितदादांच्या लाडक्या आमदारानं भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) हे अजितदादांसाठी किल्ला लढवतानाच विरोधकांची टीकाही परतवून लावतात. आता मिटकरी यांनी भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्यावर जहरी भाषेत टीका केली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा वारसा हा शरद पवार आणि अजित पवार या सिंह आणि वाघाचा आहे. त्यामुळे आम्ही लांडग्यांकडे लक्ष देत नसल्याचा खोचक टोला मिटकरी यांनी महेश लांडगेंना लगावला आहे.
मिटकरी म्हणाले, महेश लांडगे यांना कदाचित पुण्याचे आणि महाराष्ट्राचे पुढचे काका कोण? हे म्हणायचं असेल. मात्र,त्यांनी चुकीने 'आका' म्हटलं असावं, अशी मिश्किल टिप्पणी आमदार मिटकरी यांनी केली. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा संदर्भ देत भुंकणाऱ्या कुत्र्यांना भुंकू द्या,त्यांच्याकडे लक्ष देऊ नका अशा शब्दांत भाजपवर निशाणा साधला.
अजित पवारांनी पिंपरी चिंचवडमध्ये 40 हजार कोटींची विकासकामं कुठं केली असा सवाल करतानाच स्थानिक भाजप नेत्यांवर भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.त्याच अजित पवारांच्या टीकेला आमदार महेश लांडगे यांनी उत्तर दिलं होतं.यावेळी त्यांनी अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका असून आधी त्यांनी स्वतःच्या मुलाचा पराक्रम पाहावा आणि नंतर आमच्यावर टीका करावी असा खोचक पलटवार केला होता.
महेश लांडगेंनी अजित पवार हे स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपमध्ये आले आहेत,त्यांनी आम्हाला शिकवू नये असं म्हणत आव्हान दिलं होतं. तसेच त्यांनी आधी स्वतःच्या लेकाचे पराक्रम पाहावेत आणि ते स्वतः आका आहेत,हे त्यांनी जाहीर करावं. ते मला पिंपरी चिंचवडचा आका म्हणत आहेत, मुळात अजित पवार हेच महाराष्ट्राचे आका आहेत असा पलटवार लांडगेंनी देत महापालिका निवडणुकीत राजकारण तापवलं आहे.
तर भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगेंच्या टीकेवर भाष्य करताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मोजक्यात शब्दांत विषय संपवला होता. त्यावेळी अजितदादांनी मी कोण आहे जनता ठरवेल, 15 तारखेपर्यंत कळ काढा उत्तर देतो, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यानंतर अमोल मिटकरी यांनी कडक शब्दात टीका केलीय.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.