Maharashtra Eelction News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. अमरावतीच्या काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. खोडके यांनीच तसेच संकेत दिले आहेत.
मागील अनेक महिन्यांपासून आमदार खोडके या अजितदादांच्या पक्षात जाणार याची चर्चा होती. अखेर तो दिवस आला असून पुढील दोन दिवसांत त्यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. खोडके यांनी राष्ट्रवादीच्या अमरावतीतील जनसन्मान यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी केली असून अमरावतीकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
येत्या रविवारी 13 ऑक्टोबरला दुपारी दीड वाजता अमरावतीतील संत गाडगेबाबा समाधी मंदिर प्रांगणात हा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळे याच कार्यक्रमात आमदार खोडके यांचा राष्ट्रवादीत अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे. खोडके यांनी जनसन्मान यात्रेबाबत फेसबुकवर पोस्ट केली आहे.
अमरावतीच्या विकासासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने आज शहरात अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. तसेच अजितदादा पवार यांनी सरकारमध्ये असताना जे काही धोरणात्मक निर्णय घेतले त्याचा सुध्दा अमरावतीला पुरेपूर लाभ झाला आहे. म्हणूनच अजितदाद पवार यांच स्वागत व सत्कार करण्यासाठी जनसन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, असे खोडके यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.
दरम्यान, खोडके यांना काँग्रेसकडून तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा होती. राज्यसभेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केलेल्या आमदारांमध्ये खोडके यांचेही नाव चर्चेत होते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्या राष्ट्रवादीकडूनच इच्छूक होत्या. पण ही जागा काँग्रेसकडे गेल्याने त्यांनी पंजावर निवडणूक लढली आणि विजयी झाल्या. त्या काँग्रेसच्या आमदार असल्या तरी सुरूवातीपासूनच त्यांची राष्ट्रवादीशी असलेली जवळीक लपून राहिली नाही.
लोकसभा निवडणुकीवेळी खोडके काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारातही दिसल्या नव्हत्या. तसेच सोशल मीडियातील पोस्टमध्येही त्या काँग्रेसचा उल्लेख टाळत होत्या. त्यामुळे त्या राष्ट्रवादी जाणार, हे जवळपास निश्चित मानले जात होते. त्यावर अखेर रविवारी शिक्कामोर्तब होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.