
अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरील सर्व आरोपांचे पुरावे थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे सादर केले आहेत.
या पुराव्यांमध्ये अवैध वाळू उपसा आणि सावली डान्सबारविषयी गंभीर तथ्ये असल्याचा दावा परब यांनी केला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात पुरावे द्या असे सांगितल्याने परब यांनी त्यानुसार कारवाई केली असून, आता कदम यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Mumbai News : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार अनिल परब यांनी घेरले होते. त्यांच्यावर वाळू भ्रष्टाचारासह सावली बार प्रकरणावरून त्यांनी गंभीर आरोप केले होते. तसेच कदम यांचा राजीनामा मागितला होता. यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. तर परबांसह उद्धव ठाकरे यांच्यावर रामदार कदमांसह राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीत जाऊन टीका केली होती. दरम्यान अनिल परब पुन्हा एकदा आक्रमक झाले असून त्यांनी अधिवेशनात केलेल्या आरोप प्रमाणे सर्व पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज (ता.29) भेट घेतली. तसेच गृहराज्यमंत्र्यांमुळे राज्याची आणि सरकारची प्रतिमा डागाळली जात असून त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशीही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यामुळे एकीकडे शिंदे पाठराखण करत असतानाच राज्याचे मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात आता हे पाहावं लागणार आहे. (Anil Parab submits documentary evidence against Home Minister Yogesh Kadam over illegal sand mining and dance bar links to Maharashtra CM Devendra Fadnavis)
पावसाळी अधिवेशनात अनिल परब यांनी योगेश कदम यांच्यावर अवैध वाळूचा उपसा होणाऱ्या गाड्या अडवणे त्याचा दंड वसूल करण्यासह जप्त केलेल्या वाळूत भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यावरून सभागृहात जोरदार खडाजंगी झाली होती. हे प्रकरण शांत होत नाही तोच मुंबई पोलिसांनी केलेल्या सावली बार कारवाईवरून पुन्हा वातावरण तापले.
परब यांनी सावली डान्सबार हा गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावाने असून तेथे महिला नाचवल्या जातात असे आरोप केला. यानंतर रामदार कदम यांना समोर येऊन तो बार आपल्याच मालकीचा असल्याचे कबुल करत परब अर्धवट वकील असल्याची टीका केली होती. तर तसेच त्यांचवर हक्कभंग आणण्याचा इशारा दिला होता. तर सभागृहात मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करताना, परब यांनी पुरावे द्यावेत आम्ही चौकशी करू असे सांगावे लागले होते.
यानंतर आता अनिल परब यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन कदम यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे दिले. यावेळी त्यांनी, आपण विधीमंडळाच्या पावसाळी सत्राच्या अखेरच्या दिवशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर अवैध वाळूचा उपसा आणि सावली डान्सबारवरून आरोप केले होते. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावेळी पुरावे देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. त्या प्रमाणे आज मी जे आरोप केले ते सर्व पुरावे मुख्यमंत्र्यांकडे दिले आहेत. आता त्यांनी ते तपासावेत आणि गृहराज्यमंत्र्यांवर कारवाई करावी अशी मागणी केल्याचे परब यांनी म्हटलं आहे.
यावेळी परब यांनी, गृहराज्यमंत्र्यांच्या मातोश्रींच्या नावाने डान्सबार सुरू असून त्यावर याआधी 28 मे आणि 10 ऑगस्ट 2023 रोजी तसेच आता 31 मे 2025 मध्ये पोलिसांनी कारवाई केली आहे. यंदा करण्यात आलेल्या कारवाईत 22 बारबाला, 22 गिराईक आणि रोकड रक्कम जप्त करण्यात आली. त्यामुळे अशी कारवाई आत्ताच झाली आहे असे नाही. याआधी देखील पोलिसांनी कारवाई केली आहे. तर कायद्यानुसार, डान्सबारसंबंधी कोणत्याही गैरप्रकारांची जबाबदारी मूळ मालकावर येते. याबाबतचे पुरावे आपण मुख्यमंत्र्यांना दिले आहेत.
तर अवैध वाळू उपसाचे पुरावे देताना, अवैध उपसा केलेली वाळू खेडमधील योगिता डेंटल कॉलेजमध्ये डंप केल्याचे पुरावे दिले आहेत. तसेच त्यांचाच अकित मुकादम नावाचा कार्यकर्ता या वाळू उपसात सहभागी होता. तसेच परिवहन खात्याचा एक अधिकारी ई चलन मशिन वापरून वसुली करत असल्याचा व्हिडीओ मुख्यमंत्र्यांना दिल्याचे अनिल परब यांनी सांगितले आहे.
प्रश्न 1: अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांना कोणत्या पुराव्यांची सादर केली आहे?
उत्तर: त्यांनी अवैध वाळू उपसा व सावली डान्सबार प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरोधातील दस्तऐवज, पुरावे सादर केले आहेत.
प्रश्न 2: हे पुरावे देण्यामागचं कारण काय?
उत्तर: विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, आरोपांबाबत योग्य पुरावे द्यावेत. त्यानुसार परब यांनी हे सादर केले.
प्रश्न 3: परब यांनी कोणती मागणी केली आहे?
उत्तर: त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना योगेश कदम यांच्यावरील पुरावे तपासून योग्य ती कारवाई करावी आणि मंत्रिपदावरून राजीनामा घ्यावा, अशी मागणी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.