Pune News : राज्यासह देशभरात संतोष देशमुख हत्याकांडाने एकच खळबळ उडवून दिली आहे. विविध जिल्ह्यात या हत्याकांडाचे पडसाद उमटत असून आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. याबाबत सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी राज्यपालांची देखील भेट घेतली आहे. तर बीड जिल्ह्यातील नागरींकासह विरोधकांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अशीच मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. तसेच त्यांनी मुंडे यांनी जर राजीनामा नाही दिल्यास त्यांना आता जनताच बाहेर खेचेल, असा इशारा दिला आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसह मंत्री धनंजय मुंडे यांच्या चौकशीची मागणीही करण्यात येत आहे. तसेच या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड याची आणि मारेकऱ्यांची जोपर्यंत चौकशी होत नाही तोपर्यंत मुंडे यांना मंत्री पदावरुन दूर करावे, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. त्या देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी बीडमध्ये तळ ठोकून आहेत. दरम्यान समाजमाध्यमांवरील घाणेरड्या ट्रोलींगच्या संदर्भात काल (ता. 6) त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. तसेच 10 मागण्या केल्या होत्या.
पण आता धनंजय मुंडे राजीनामा द्यावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. यावेळी दमानिया यांनी सांगितले की, सिंचन घोटाळ्यासंदर्भात मी आणि विजय पांढरे यांनी अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. त्यावेळी त्यांनी पदाचा राजीनामा दिला होता. तसेच चौकशी निष्पक्ष व्हावी यासाठी स्वतः सहकार्य केले होते. मग आता धनंजय मुंडे यांच्याबाबत का असे होत नाही. अजित पवार याबाबत का बोलत नाहीत. यावर त्यांनी उत्तर द्यावं, असेही आवाहन दमानिया यांनी केले आहे.
दरम्यान धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात कॅबीनेटच्या बैठकीला हजेरी लावली. यानंतर राजीनाम्यावर त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी, आपण राजीनामा दिला नाही आणि देणार नाही, अशी भूमिका स्पष्ट केली. यावर दमानिया यांनी संताप व्यक्त केला आहे. एखादा सज्जन व्यक्ती त्याच्यावर होणाऱ्या आरोपानंतर अशी भूमिका घेणार नाही. त्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला असता. तसेच निष्पक्ष चौकशीसाठी तयार झाला असता. उलट मुंडे म्हणतात राजीनामा दिला नाही आणि देणार नाही. जणाची नाही तर मनाची तरी लाज वाटायला हवी. कसलीही लाज नसल्यामुळेच ते मंत्रिपद सोडायला तयार नाहीत, असा घणाघात देखील दमानीया यांनी केला आहे.
तसेच मुंडे यांच्यावर आता जनतेचा रोष असूने ते त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. आता जर त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला नाही तर लोकच त्यांना खेचून बाहेर काढतील, असाही इशारा दमानिया यांनी यावेळी दिला आहे.
दरम्यान त्यांनी ट्रोलिंग आणि धमक्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन माहिती दिली आहे. यानंतर त्यांनी आपण आपल्या सुरक्षेची मागणी कधीही केलेली नाही. पण आता वाल्मीक कराडचे कार्यकर्ते आपल्याला धमकावत आहेत. वाल्मीक कराडची दहशत खूप मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आता परमेश्वरच सुरक्षा करेल, अशी खात्री असल्याचेही दमानिया यांनी म्हटलं आहे.