BARTI Fellowship: PhD विद्यार्थ्यांना मोठा धक्का! बार्टी, सारथी, महाज्योती अधिछात्रवृत्तीला फक्त 100 जागा; HRAही बंद

Maharashtra's BARTI, SARTHI and Mahajyoti PhD fellowship: बार्टी, सारथी, महाज्योती व आर्टीच्या पीएचडी अधिछात्रवृत्तीसाठी वर्षाला 100 जागांची मर्यादा. घरभाडे भत्ता व आकस्मिक खर्च बंद केल्याने संशोधक विद्यार्थ्यांमध्ये संताप.
Maharashtra's BARTI, SARTHI and Mahajyoti PhD fellowship
Maharashtra's BARTI, SARTHI and Mahajyoti PhD fellowshipAI
Published on
Updated on

प्रज्वल रामटेके

Pune News: राज्यातील ‘बार्टी’, ‘सारथी’, ‘महाज्योती’ आणि ‘आर्टी’ या स्वायत्त संस्थांमार्फत पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्तीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष २०२३ ते २०२५ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी प्रसिद्ध झालेल्या या जाहिरातीत प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी केवळ १०० जागांची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

यासोबतच अधिछात्रवृत्तीअंतर्गत मिळणारा घरभाडे भत्ता (एचआरए) आणि संशोधनासाठीचा आकस्मिक खर्च (कॉन्टिजन्सी) यांसारख्या महत्त्वपूर्ण लाभांची तरतूद वगळण्यात आली आहे. जागांमधील कपात आणि आर्थिक भत्त्यांचे उच्चाटन यामुळे राज्यातील संशोधक विद्यार्थ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राज्यातील विविध विद्यापीठांमध्ये दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी पीएच.डी. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतात. यापैकी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती हा संशोधन सुरू ठेवण्याचा महत्त्वाचा आधार असतो.

या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध घटकांसाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (बार्टी), ‘छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था’ (सारथी), ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (महाज्योती) ‘आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (टीआरटीआय) आणि ‘अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था’ (आर्टी) यांच्या माध्यमातून पीएच.डी. करणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी अधिछात्रवृत्ती योजना राबविली जाते.

गेल्या तीन वर्षांपासून या संस्थांतर्फे अधिछात्रवृत्तीची जाहिरात प्रसिद्ध झाली नव्हती. त्यामुळे संशोधक विद्यार्थ्यांचे लक्ष या जाहिरातीकडे लागले होते. तीन वर्षांनंतर अखेर जाहिरात प्रसिद्ध झाली. मात्र त्यामधील जागांची मर्यादा आणि नव्याने घालण्यात आलेल्या अटी-शर्तींमुळे विद्यार्थ्यांची निराशा झाली आहे.

याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता ते म्हणाले, ‘‘यापूर्वी पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना अधिछात्रवृत्तीचा लाभ मिळत होता. त्यानंतर ही संख्या ३०० पर्यंत मर्यादित करण्यात आली. आता मात्र प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी केवळ १०० जागा निश्चित करण्यात आल्याने पात्र विद्यार्थ्यांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण होणार आहे. परिणामी अनेक गुणवंत संशोधकांना अधिछात्रवृत्तीपासून वंचित राहावे लागेल.

Maharashtra's BARTI, SARTHI and Mahajyoti PhD fellowship
Teacher News: हजारो शिक्षकांची धाकधूक वाढली! पदवीधर वेतनश्रेणीला पुन्हा ब्रेक? सरकार सर्वोच्च न्यायालयात; SLP कडे लागले लक्ष

याशिवाय अधिछात्रवृत्तीच्या सुधारित नियमांमध्ये घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्चाची तरतूद वगळण्यात आली आहे. संशोधनासाठी आवश्यक असलेली पुस्तके, प्रयोगशाळेतील साहित्य, प्रवास, डेटा संकलन, परिषदांमधील सहभाग, संगणकीय सुविधा आणि इतर शैक्षणिक खर्च विद्यार्थ्यांना स्वतःच्या खिशातून करावा लागणार आहे.

विशेषतः पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक यांसारख्या शहरांमध्ये राहणाऱ्या संशोधक विद्यार्थ्यांसाठी घरभाड्याचा खर्च मोठा असल्याने त्यांच्यावरील आर्थिक ताण अधिक वाढणार आहे.’’ त्यामुळे राज्य सरकारने या धोरणाचा फेरविचार करावा, अधिछात्रवृत्तीवरील जागांची मर्यादा रद्द करून पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अधिछात्रवृत्ती मंजूर करावी, तसेच पूर्वीप्रमाणे घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्चाची सुविधा पुन्हा सुरू करावी, अशी मागणी संशोधक विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांनी केली आहे.

Maharashtra's BARTI, SARTHI and Mahajyoti PhD fellowship
Disability Certificate Scam: बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांवर सरकारी नोकरी! सोलापूर शासकीय रुग्णालयातील 2 लिपिकांसह 6 जण अटकेत

विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या

  1. अधिछात्रवृत्ती धोरणाचा तातडीने फेरविचार व्हावा.

  2. जागांची मर्यादा हटवून विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार अधिछात्रवृत्ती उपलब्ध करून द्यावी.

  3. पूर्वीप्रमाणे घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च पुन्हा लागू करावा.

‘‘बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या अधिछात्रवृत्तीच्या जाहिरातीत प्रत्येक वर्षासाठी केवळ १०० जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. ही मर्यादा संशोधक विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आहे. त्याचबरोबर घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्च वगळून विद्यार्थ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्यात आला आहे. संशोधन करणाऱ्या प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला अधिछात्रवृत्ती मिळाली पाहिजे.’’

- डॉ. राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती, महाराष्ट्र राज्य

‘‘घरभाडे भत्ता आणि आकस्मिक खर्चाची रक्कम बंद केल्याने प्रत्यक्ष संशोधनाचा खर्च विद्यार्थ्यांनाच उचलावा लागणार आहे. फील्डवर्क, पुस्तके, डेटा संकलन, परिषदांमध्ये सहभाग यासाठी मोठा खर्च होतो. शासनाने या निर्णयाचा फेरविचार करून पूर्वीच्या सुविधा कायम ठेवाव्यात.’’

- प्राजक्ता शिंदे, संशोधक विद्यार्थी

आधी मिळणारा घरभाडे भत्ता :

  • - पहिली दोन वर्षे (जेआरएफ) : ‘एक्स’ शहर (३०%) - ११,१००, ‘वाय’ शहर (२०%) - ७,४०० ‘झेड’ शहर (१०%) - ३,७००

  • - पुढील तीन वर्षे (एसआरएफ) : ‘एक्स’ शहर (३०%) - १२,६०० रु. ‘वाय’ शहर (२०%) - ८,४०० ‘झेड’ शहर (१०%) - ४,२०००

  • बदललेल्या अटींनूसार आता मिळणारा घरभाडे भत्ता : शुन्य

आकस्मिक खर्च कपात

  • मानवशास्त्र, सामाजिक शास्त्र, वाणिज्य : पहिली दोन वर्षे (जेआरएफ) - १०,०००, पुढील तीन वर्षे (एसआरएफ) - २०,५००

  • विज्ञान, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान : पहिली दोन वर्षे (जेआरएफ) - १२,०००, पुढील तीन वर्षे (एसआरएफ) - २५,०००

  • बदललेल्या अटींनूसार आता मिळणारी आकस्मिक खर्च रक्कम : शुन्य

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com