
Nagpur News : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बंपर यश मिळाले आहे. त्यानुसार सरकराही स्थापन झाले आहे. मात्र मंत्रिमंडळातील वाटा, तीनही पक्षांना सोबत घेऊन जाताना कुरबुरी आणि मतभेद वाढत चालले आहेत. त्यामुळे महायुती भविष्यात कायम राहील की नाही? याविषयी शंका व्यक्त केली जातेय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ असल्याने प्रत्येकजण स्वबळाची भाषा करत आहे. भाजपच्या अनेक नेत्यांनी शत प्रतिशत भाजप असे दावे करणे सुरू केले आहे. असे असले तरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील पंधरा वर्षे भाजप आणि युतीचे सरकार राहील असे भाकीत केलं आहे.
भाजपच्या स्थापना दिनानिमित्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे राज्यातील सर्व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी कोराडी येथील जनसंपर्क कार्यालयातून बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. बावनकुळे म्हणाले, नेत्यांच्या निवडणुका आटोपल्या आहेत. आता आगामी निवडणुका या कार्यकर्त्यांच्या आहेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष, पंचायत समिती अध्यक्ष आणि सरपंच आपलाच राहील. यासाठी कामाला लागा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे. या संकल्पना आपल्याला पुढे न्यायच्या आहेत. फडणवीस सरकारने घेतलेले निर्णय राज्यातील 14 कोटी जनतेपर्यंत पोहचवून जनतेच्या विकासासाठी आपण संकल्पित झालो पाहिजे. पुढच्या 15 वर्षात भाजप आणि महायुती राज्यात भक्कमपणे काम करेल, असेही बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
आज पक्षाच्या एक लाख कार्यकर्त्यांनी राज्यात एक कोटी 51 लाख सदस्य नोंदणी केली आहे. यानिमित्ताने एक लाख सक्रीय सदस्य झाले आहेत. मात्र, केवळ सदस्य करून चालणार नाही, तर राज्यात पुढील काळात मोठे परिवर्तन घडवायचे आहे. यासाठी आपल्या पक्षाला सरकारसोबत जोडून राज्याच्या विकासात महत्त्वाचे योगदान द्यायचे असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये युती करायची की नाही, याचे अधिकार भाजपचे स्थानिक नेत्यांना दिले आहे. जिल्हाध्यक्ष वा शहराध्यक्षांच्या निर्णयात हस्तक्षेप केला जाणार नाही, असेही प्रदेशाध्यक्षांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यातून अनेक महापालिकांमध्ये भाजप स्वबळावर लढणार असल्याचे संकेत मिळत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.