Political News : महाड येथील चवदार तळ्याजवळ माजी मंत्री जितेंद्र आव्हाडांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडले. त्यामुळे बाबासाहेबांचा अवमान करणार्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करण्यावरून सत्ताधारी व विरोधक आक्रमक झाले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. आव्हाडांचा बंदोबस्त करण्यासाठी भाजप उद्या (३० मे) राज्यभर आंदोलन करून रस्त्यावर उतरणार असल्याचे भाजपचे प्रदेशअध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात भाजपने (Bjp) आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रत्येकवेळी महायुतीवर तुटून पडण्याची एकही संधी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड सोडत नाहीत. त्यामुळे आता भाजप आव्हाडांना चांगलाच धडा शिकवणार असून त्यांच्या बंदोबस्तासाठी भाजप गुरुवारी रस्त्यावर उतरणार आहे.
आव्हाड यांच्या विरोधात पोलिसांनी कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे येत्या काळात जितेंद्र आव्हाड यांच्यावर कारवाई करण्याचा आग्रह धरणार असल्याचे स्पष्ट केले.
महाड येथे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून बाबासाहेबांचा अवमान करणार्या जितेंद्र आव्हाड यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन अटक करावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते सुद्धा आक्रमक झाले आहेत. त्यांनी कठोर कारवाई करण्याचा आग्रह धरला असल्याने राज्यभरातील वातावरण चांगलेच तापले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, या प्रकरणात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awahad) यांच्या विरोधात कारवाई केली पाहिजे, असा इशारा मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. संविधान ज्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिले, त्यांचा फोटो फाडण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. कधी काँग्रेस फोडायची तर कधी बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत अशी कृती करत नंतर सांगायचे. मुळात बाबासाहेबांबाबत अशी कृती मान्यच नाही, असेही प्रसारमाध्यमांशी बोलताना मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.