

Abhijeet Dipke: कॉक्रोच जनता पार्टीनं आता खऱ्या अर्थानं एक दबाव गट म्हणून कामाला सुरुवात केली आहे. दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर लोकशाही मार्गानं २३ दिवसांचं उपोषण आणि संसदेवर मोर्चाचं आयोजन करुन नीट परीक्षा पेपरफुटीला जबाबदार असलेल्या केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. त्यानंतर नुकतेच या संघटनेच्या टीमनं देशभरातील जनतेचे सामाईक अन् अत्यंत महत्वाचे प्रश्न जाणून घेण्यासाठी 'क्या बोलती पब्लिक' नावाच्या कॅम्पेनची घोषणा केली. त्यानंतर आता ग्रामीण भागातील शाळा सुधरवण्यासाठी येत्या स्वातंत्र्यदिनापासून अर्थात १५ ऑगस्टपासून नवी मोहिम हाती घेतली आहे. त्यासाठी अभिजीत दिपके स्वतः पासून सुरुवात करणार असून त्यांनी आपल्या गावाला भेट देणार असल्याचं सांगितलं. तसंच राज्यातील सर्व गावच्या सरपंच मंडळींनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा त्यासाठी सीजेपीनं नियोजनबद्ध कार्यक्रम आखल्याचं त्यांनी सोशल मीडियातून व्हिडिओ संदेशाद्वारे सांगितलं आहे.
अभिजीत दिपके यांनी सांगितलं की, यंदाच्या १५ ऑगस्टला आपल्या देशाचा ८० वा स्वातंत्रदिन साजरा होत आहे. पण देश स्वतंत्र होऊन ८० वर्षात जर कुठली गोष्ट सर्वाधिक दुर्लक्षित झाली असेल तर ती आहे, तर आपल्या गावांमध्ये असलेल्या सरकारी शाळा. ८० वर्षात गावातील शाळांवर आपण जराही काम केलेलं नाही. आपण नवं संसद भवन, नवं पंतप्रधान कार्यालय बनवलं पण गावांमध्ये नव्या शाळा आपण बनवू शकलो नाही. आपल्या गावांमध्ये शेतकरी आणि मजुरांची जी मुलं शिकतात त्यांना आपण देशाचं भविष्य मानत नाही का?
आजवर त्या मुलांसाठी आपण काय केलं? त्यांना आपण आजवर त्या सुविधा उपलब्ध का करुन देऊ शकलो नाही. ज्या सुविधा मोठ्या शहरातील कुठल्याही मुलाला मिळतात. आजही गावातील मुलांना पायी चालत जाऊन कितीतरी दूर शाळेत जावं लागतं. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांच्यासाठी ना पाण्याची सोय असते ना शौचालयाची सोय असते. यामुळं लहान मुलींना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळं मला वाटतं की या १५ ऑगस्टला जर आपल्याला काही महत्वाचं करायचं असेल तर एक नवी सुरुवात करायची असेल तर आपल्या सरकारी शाळांना व्यवस्थित करुन करायला हवी. यासाठी मी स्वतः माझ्या गावी हिंगोलीला जाऊन तिथल्या गावातील सरपंचांना विनंती करणार आहे की त्यांनी गावातील शाळा व्यवस्थित करावी.
त्याचबरोबर अभिजीत दिपकेंनी इतर सर्व सरपंचांना देखील आवाहन केलं की, आपल्याकडं यानिमित्तानं एक संधी आहे की, गावांमध्ये ज्या काही सरकारी शाळा आहेत त्या आपण व्यवस्थित केल्या पाहिजेत. कारण या शाळांमध्ये शिकणाऱ्या शेतकर्यांच्या आणि मजुरांच्या मुलांनाही वाटावं की आपणही यादेशाचे भविष्य आहोत. जर गावातील सरपंचांनी आपल्या गावातील शाळा व्यवस्थित केल्या तर आम्ही त्या शाळांचे फोटो आणि सरपंचांचं नाव सीजेपीच्या व्यासपीठावरुन जाहीर करु. यामुळं इतर सरपंचांना देखील प्रोत्साहन मिळेल.
त्याचबरोबर सोशल ऑडिट करण्याचं कामही आपण करायचं आहे. त्यासाठी ज्या पालकांची मुलं सरकारी शाळांमध्ये शिकतात, त्यांना माझं आवाहन आहे की त्यांनी एक सोशल ऑडिट करायला सुरुवात करावी. तुम्ही तुमच्या मुलांच्या शाळांमध्ये जा तिथं जाऊन हे पाहा की मुलांसाठी बेसिक सुविधा उपलब्ध आहेत की नाही. त्याठिकाणी लाईट आहे का? पाणी आहे का? तुमच्या मुलांना शौचालयांची सुविधा आणि मध्यान्ह भोजन मिळतंय की नाही? हे तपासा. जर हे सर्वकाही तिथं नसेल तर त्याचे व्हिडिओ बनवा. कारण तुमच्या मुलांचं शिक्षण चांगलं व्हावं हा तुमच आणि तुमच्या मुलांचा मुलभूत अधिकार आहे.
यासाठी आम्ही एक फॉर्म तयार करणार आहोत, तो आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत. हा फॉर्म प्रिंट करुन तुम्ही तो भरुन आम्हाला पाठवू शकता. यामध्ये तुमच्या मुलांच्या शाळांमध्ये काय सुविधा उपलब्ध आहेत आणि काय सुविधा नाहीत याची माहिती द्यायची आहे. यानंतर हे फॉर्म तुम्ही आम्हाला contactcockroachjanataparty.org या ई-मेल आयडीवर पाठवू शकता. अशा प्रकारे एकत्र येऊन आपण गावांमध्ये राहणाऱ्या मुलांना वचन देऊयात की, आम्ही त्यांच्या शाळा व्यवस्थित करु, एकत्र येऊन हे आपण करु शकतो. आपण सर्वजण एकत्र येऊन हे काम नक्कीच करु शकतो कारण खरा भारत हा गावांमध्येच राहतो.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.