
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडवर तीव्र टीका केली आहे.
फडणवीसांनी दावा केला की मुंबई महापालिकेत महायुतीचाच महापौर बसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपा-शिवसेना संघर्ष तीव्र झाला आहे.
Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलल्या गेल्या आहेत. यामुळे विरोधकांकडून सरकारला जबाबदार ठरवले जात आहे. अशातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मोठं वक्तव्य केले आहे. त्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा करताना रणशिंग फुंकलं असून उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांवर जोरदार निशाना साधला आहे. तसेच आपल्या भाषणात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ठाकरे ब्रँडवर देखील सडकून टीका केली आहे. तर काहीही झालं तरी आम्हीच मुंबई जिंकणारच असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे. ते आज मुंबईतील वरळी येथील भाजपच्या विजयी संकल्प मेळाव्यात बोलत होते. वरळी ठाकरेंचा बालेकिल्ला असून आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. राजकीय पक्षांचे नेते राज्यभर दौरे करताना दिसत आहेत. तर काही पक्ष मेळावे आणि आंदोलनातून वातावरण निर्मिती करताना दिसत आहे. अशावेळी भारतीय जनता पक्षाने मुंबईत विजय संकल्प मेळावा घेवून महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा एक प्रकारे नारळ फोडला.
फडणवीस यांनी, आम्ही 2024 मध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणून दाखवलं असून आता महापालिकेच्या निवडणुकीकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. आता काही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे. तो फडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. माध्यम प्रतिनिधींनी माझे शब्द लिहून ठेवा, हवं तर रेकॉर्ड करा. ते जपून ठेवा आणि नंतर सगळीकडे दखवा कारण की, काहीही झालं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच झेंडा फडकणार. पालिकेवर महायुतीचीच सत्ता येणार आणि महापौर हा महायुतीचाच होणार. तो केल्याशिवाय भाजपचा कार्यकर्ताही शांत राहणार नाही. मग कोणी बरोबर आलं तरी ठिक नाही आलं तरी ठिक असे म्हणत त्यांनी विश्वासही व्यक्त केला आहे.
यावेळी फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाना साधला. त्यांनी, ठाकरेंची भाषणांना मी 100 रूपयेही देणार नाही. त्यांच्या भाषणात विकासाबद्दल काहीच नसते. ठाकरे मुंबईच्या विकासावर बोलणारही नाहीत. ते आज मराठी मराठी करत आहेत. पण मुंबईचा मराठी माणूस मुंबईच्या बाहेर यांच्यामुळेच फेकला गेला आहे. त्यांच्याकडे विकासाबद्दल बोलण्यासाठी काहीच नाही. फक्त ठाकरे ब्रँड म्हणून होत नाही, असा टोला लगावला आहे.
तसेच त्यांनी मुंबईतील बेस्ट सहकारी पतपेढीच्या निवडणुकीचा दाखल देत ठाकरे बंधूना डिवचले आहे. फडणवीस यांनी, “खरं म्हणजे काही लोक आपलं हसू करून घेतात. साध्या बेस्टच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणू नका असे सांगितलं होतं. पण काहीजण आमचा ब्रँड, आमचा ब्रँड म्हणत होते. काय झालं. निवडणुकीत ब्रँडचा बँड वाजवला. तो आमच्या शंशाक राव आणि प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी वाजवला अशी खोचक टीका देखील फडणवीस यांनी ठाकरे बंधूंवर केलीय.
तर ठाकरे बंधूसह खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता एक लक्षात असू घ्या, फक्त ठाकरे ब्रँड म्हणजे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेच, तेच ब्रँड होते. तुम्ही ब्रँड नाही. फक्त नाव लावल्याने कोणी ब्रँड होत नाही. पण आमच्या पक्षाची परंपरा बघा. आशिष शेलारांच्यानंतर त्यांचा मुलगा अध्यक्ष झाला नाही. पण अमित साटम मुंबई भाजपचे अध्यक्ष झाले, साधा कार्यकर्ता.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष असून आमच्या पक्षातील नेतृत्व जनतेतून तयार होतं. त्यामुळे आमच्याकडे चहा विकणारा जागतिक ब्रँड म्हणून जगात एस्टॅब्लिश होतो. असा ब्रँड निर्माण करणारा आमचा पक्ष आहे. त्यामुळे उगाच आम्हाला कोणी ब्रँड सांगू नये. जगातला सर्वात मोठा ब्रँड आमच्याकडे आहे, त्या ब्रँडचं नाव आहे नरेंद्र मोदी.
1. ठाकरे ब्रँडवर टीका कोणी केली आहे?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी.
2. फडणवीसांनी कोणत्या निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे?
मुंबई महापालिका (BMC) निवडणुका.
3. फडणवीसांनी महापौराबद्दल काय विधान केले?
महायुतीचाच महापौर होणार असा विश्वास व्यक्त केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.