मुंबई : राज्याचे नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. शपथविधीनंतरचा दोघांचाही हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. या दौऱ्यात काल संध्याकाळी त्यांनी भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. तर आज सकाळी महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind), केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, सॉलिसीटर जनरल तुषार मेहता आणि अखेरीस संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली.
या भेटीगाठी सुरु असतानाच दुपारी शिंदे-फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेवून विविध प्रश्नांची माहिती दिली. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर विचारेल्या प्रश्नावर देखील भाष्य केले. ते म्हणाले, दिल्ली दौऱ्यांमधील भेटीगाठी सदिच्छा होत्या. मात्र आम्ही दोघेही आषाढी एकादशी झाली की मुंबईत बसून राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत चर्चा करू आणि तुमच्या मनातील प्रश्नाचे उत्तर देऊ. पण १८ जुलै रोजी राष्ट्रपतीपदाची निवडणूक आणि पावसाळी अधिवेशन देखील आहे, त्याच्या आगेमागे हा विस्तार होईल, असे त्यांनी सांगितले.
आमदार पैशाने विकले गेले नाहीत :
बंडखोरी केलेले आमदार पैशाने विकले गेले असा आरोप शिवसेना (ठाकरे गट) कडून करण्यात येत आहे. यावर बोलताना शिंदे म्हणाले, शिवसेना-भाजप युतीचं सरकार जे अडीच वर्षींपूर्वी झालं पाहीजे होतं ते आम्ही आता स्थापन केले आहे.
एक ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवक देखील एकडे तिकडे जायला दहा वेळा विचार करतो, हे ५० आमदार तर तीन-चार लाख लोकांमधून निवडून आले आहेत. या आमदारांना मागच्या अडीच वर्षात अनुभव आला आहे. मुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. हे आमचं हे बंड नाही, ही गद्दारी म्हणतायत ही गद्दरी नाही, ही क्रांती आहे, अन्यायाविरोधातील उठाव आहे, हे पैशांने विकले जाणारे नाहीत.
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको :
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नको, सरकार देखील याच मताचे आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ओबीसींना न्याय देण्यासाठी सरकार कुठेही कमी पडणार नाही, आपण निवडणूक आयोगाशी संवाद साधून त्यांना विनंती करु, असा विश्वासही शिंदे यांनी दिला. तसेच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, अनेक ठिकाणी महापूर आहे, त्यामुळे निवडणुकीची यंत्रणा पोहचू शकत नाही. मनुष्यबळ मदतीच्या कामात असते अशा स्थितीमध्येही निवडणुका घेता येणे अवघड असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.