
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.
प्रवेशावेळी सांगली विकासासाठी 5 मागण्या केल्या, त्यातील पहिली मागणी तात्काळ मंजूर झाली.
चंद्रकांत पाटील यांनी सांगलीकरांना मोठं गिफ्ट दिल्याची घोषणा केली.
Mumbai News : काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आज अधिकृतरीत्या प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री जयकुमार गोरे, आमदार प्रविण दरेकर यांच्यासह भाजपचे इतर नेते उपस्थित होते. यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी आपल्या भाजप प्रवेशामागे सांगलीचा विकास हाच ध्यास असल्याचे सांगत पाच मागण्या केल्या. यावेळी त्यांची पहिली मागणी आधीच मान्य झाल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. यामुळे प्रवेश होताच सांगलीसाठी मोठं गिफ्ट भाजपकडून मिळाल्याचे बोलले जात आहे.
यावेळी त्यांनी, माझ्यासह हजारो कार्यकर्त्यांचा आज भाजपमध्ये प्रवेश झाला. पण याधी मी सह्याद्री अतिगृहामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यांना आपल्या मागण्या काय आहेत त्याचे निवेदन दिले. त्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन फडणवीस यांनी दिलं आहे. मी गेली 35 वर्ष काँग्रेस पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत असून आता सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष होतो. दोन वेळी विधानसभेच्या निवडणूक लढवली. पण बंडखोरी झाली नसती तर मी आमदार झालो असतो. पण या निवडणुका ही सांगलीच्या प्रश्नांसाठीच लढवल्या होत्या. त्यासाठी मी पंचसूत्री तयार केली होती. तीच आता मी प्रवेशावेळी मुख्यमंत्र्यांना दिली आहे.
त्यामुळे माझ्या प्रवेशाचे मूळ हे आधी सांगली नंतर पक्ष आणि त्यानंतर मी असेच आहे. माझी पहिला मागणी सांगलीला शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा ही आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या धरतीवर चांदोली धरणातून थेट पाणी पुरवठा करण्याची योजना आखण्यात यावी. शहराच्या प्रदुषण मुक्तीसाठी असणारा 95 कोटींचा प्रस्ताव मंजूर करावा. या मागणी केल्या असत्या चंद्रकांतदादांनी शुद्ध व मुबलक पाणीपुरवठ्यासाठी सर्व्हे करून त्याचा प्रस्ताव पुढे पाठवला जाईल असे सांगितल्याचेही पृथ्वीराज पाटील म्हणाले.
तसेच सांगलीच्या विकासासाठी महत्वाचा असणाऱ्या अॅग्रो टेक हबच्या निर्मितीसाठी कवलापूर विमानतळाला लवकर मान्यता देण्यात यावी. तसे झाल्यास येथील हळद, द्राक्ष, बेदाणा, डाळिंबासह इतर शेतीतून निघणारे उत्पादन बाहेर पाठवता येईल. तसेच सांगलीच्या पर्यटन विकासाला गती देण्यासाठी कृष्णा घाट डेव्हलप करण्यात यावा. तर येथील वर्ग दोनमध्ये असणाऱ्या जमिनी वर्ग एकमध्ये करून वर्षांनुवर्षे राहणाऱ्या नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.
त्याचबरोबर त्यांनी शहरातील महिलांच्या सुरक्षेला पाहता विविध ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात यावेत. तर 2005 असो की 2019 किंवा 2021 यावेळी सांगलीला पूराचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आम्ही काही तज्ज्ञांच्या मदतीने तयार केलेल्या आराखड्याला मान्यता देवून त्यावर काम सुरू करावे, अशा मागण्या केल्या होत्या. त्यावर पालकमंत्री पाटील यांनी, 600 कोटींची निविदा याकामी आधीच काढण्यात आल्याची घोषणा केलीय.
आमदार सुधीर गाडगीड यांना चिमटा
यावेळी पृथ्वीराज पाटील यांनी, आपण आज भाजपमध्ये आलो असल्याने आता आमदार सुधीर गाडगीड हे मित्र झाले आहेत. त्यामुळे त्यांनी मदत करावी, दोघांनी मिळून सांगलीच्या विकासासाठी प्रयत्न करू... असे सांगत तुमची साथ असेल का आहे का असे दोनदा विचारणा केली. जर त्यांनी होकार दिला नाही, तर आपण अद्याप काँग्रेसमध्येच असल्याचे वाटेल असा चिमटा त्यांनी गाडगीळ यांचा काढला.
सन्मान कार्यकर्त्यांनाही मिळावा
भाजप प्रवेश करताना ज्या पद्धतीने मला सन्मान मिळाला. अध्यक्षांनी परकेपणाची वागणूक दिली नाही. तसाच सन्मान माझ्याबरोबर ज्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला त्यांनाही मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी, भारतीय जनता पार्टी हे काम करण्याच्या मागं उभारणारी पार्टी आहे. तुम्ही 2019 ची निवडणूक थोडक्यात हरलात. 24 ला कदाचित काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली नसती तर आज तुम्ही आमदारही झाला असता. त्यामुळेच तुमचा प्रवेश आज भाजपमध्ये झाला आहे. ज्या पद्धतीने तुमचा सन्मान पक्षात आहे. तसाच तुमच्या कार्यकर्त्यांनाही मिळेल असे आश्वासन रवींद्र चव्हाण यांनी यावेळी पृथ्वीराज पाटील यांना दिले आहे.
प्र.१: पृथ्वीराज पाटील भाजपमध्ये का सामील झाले?
उ: सांगलीच्या विकासासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
प्र.२: त्यांच्या किती मागण्या मान्य झाल्या?
उ: पहिली मागणी प्रवेशाच्या दिवशीच मान्य झाली.
प्र.३: या प्रवेशावेळी कोणते नेते उपस्थित होते?
उ: रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, जयकुमार गोरे, प्रविण दरेकर आणि इतर भाजप नेते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.